पश्चिम बंगालसह तामीळनाडू, केरळ, आसाम, पुद्दुचेरीत निवडणुका; 2 मे रोजी निकाल

देशात कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या वाढत असतानाच पश्चिम बंगालसह तामीळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. 27 मार्च ते 29 एप्रिलपर्यंत ही निवडणूक होणार असून, 2 मे रोजी पाचही राज्यांचे निकाल जाहीर होतील, अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. दरम्यान, अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तब्बल आठ टप्प्यांत मतदान होणार असल्याने तर्कविर्तकांना उधाण आले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली.

पाचही राज्यांत भाजपची परीक्षा

दिल्लीच्या सीमांवर तीन महिन्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन, पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरची वाढती महागाई, पुन्हा वाढलेला कोरोना संसर्ग या पार्श्वभूमीवर होत असलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका ही भाजपसाठी परीक्षाच असणार आहे.

विशेषतः पश्चिम बंगालमध्ये भाजपने निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या दीड वर्षापासून पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचार सुरू केला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.

तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठीही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. 2011, 2016 नंतर आता ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची हॅट्रीक करणार का? याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

2016 च्या निवडणूक निकालाकडे पाहिले तर पश्चिम बंगालमध्ये भाजपला ही निवडणूक सोपी नाही. 2016 ला 295 जागांपैकी तृणमुल काँग्रेसने तब्बल 211 जागा मिळवून प्रचंड बहुमत मिळविले होते. काँग्रेसला 44, माकप 26 आणि भाजपचे अवघे तीन आमदार होते.

आसाममध्ये 2016 ला भाजपने आसाम गण परिषद आणि बोडोलँड पिपल्स प्रंटबरोबर आघाडी करून निवडणूक लढविली. ‘एनडीए’ला 126 पैकी 86 जागा मिळाल्या. भाजपचे सर्बानंद सोनोवाल मुख्यमंत्री झाले. काँग्रेसला 26 जागा मिळाल्या होत्या. ऑल इंडिया डेमोव्रॅटिक प्रंटचे 13उमेदवार निवडून आले होते. यावेळी भाजपला पुन्हा सत्ता मिळविण्याचे अव्हान असणार आहे.

दक्षिणेतील मोठे राज्य असलेल्या तामिळनाडू विधानसभेत भाजपला अद्याप शिरकाव करता आलेला नाही. 2016 ला अण्णाद्रमुकने 234 पैकी तब्बल 150 जागा जिंपून सत्ता मिळविली होती. तामिळनाडूच्या राजकारणात अण्णा द्रमुक किंवा द्रमुक या दोन पक्षांचीच अनेक वर्षांपासून सत्ता आहे. यावेळी निवडणुकीचे वैशिष्टय़ म्हणजे अण्णा द्रमुकच्या जयललीता आणि द्रमुकचे करूणानिधी हे दोन बडे नेते हय़ात नाहीत.

केरळमध्ये आतापर्यंत माकपच्या नेतृत्वाखालील एलडीएफ किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफ आघाडीची सत्ता राहिली आहे. 2016 ला 140 पैकी 91 जागा जिंकून माकपचे पी. विजयन मुख्यमंत्री बनले होते. भाजपला एकही जागा मिळाली नव्हती.

मोदी, शहांना विचारून तारखा ठरवल्या का?

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. इतर राज्यांप्रमाणे एका टप्प्यात मतदान का घेतले जात नाही? भाजपच्या सोयीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना विचारून आयोगाने तारखा जाहीर केल्या का? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने भाजपच्या नजरेतून पश्चिम बंगालकडे पाहू नये. पश्चिम बंगाल हे एक राज्य आहे म्हणून पाहावे, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या