केरळ विमान दुर्घटना – देशासाठी दोन्ही मुलं गमावणाऱ्या निला साठे यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

2642

शुक्रवारी केरळच्या कोझिकोड येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत दुबईवरून आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला (Air India Express) ला भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 21 जणांनी प्राण गमावला आहे. या दुर्घटनेत महाराष्ट्राचे सुपुत्र पायलट दीपक वसंत साठे यांचाही मृत्यू झाला. मूळचे नागपूर येथील असणारे कॅप्टन दीपक वसंत साठे हे माजी वायुसेना पायलट होते. त्यांचा सख्खा भाऊ देखील लष्करात होता.

आपले दोन्ही पुत्र देशासाठी गमावलेल्या निला साठे यांनी नागपूर येथे ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. ‘दीपक हा कर्तृत्ववान मुलगा होता. कोणालाही मदत करण्यात तो सर्वात आधी पुढाकार घेत होता. त्याने आपले जीवन देशासाठी अर्पण केले’ असे उद्गार कॅप्टन दीपक वसंत साठे यांच्या मातोश्री निला साठे यांनी भरल्या डोळ्यांनी काढले. तसेच यावेळी त्यांनी आपल्या मुलाच्या आठवणी ताज्या केल्या.

दीपक साठेंनी कसे वाचवले प्रवाशांचे प्राण? सविस्तर पोस्टद्वारे भावाने सांगितले

‘त्याचे शिक्षक आजही त्याची आठवण काढतात. अहमदाबाद येथे आलेल्या भयंकर पुराच्या वेळी त्याने सैनिकांच्या लहान मुलांना खांद्यावर घेऊन पुरातून बाहेर काढले आणि वाचवले होते. त्याच्याऐवजी देवाने मला बोलावून घेतले असते तर…’, असे म्हणत निला साठे यांना अश्रू अनावर झाले. माझ्या दोन्ही मुलांनी आपले जीवन देशाला अर्पण केले, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

एअर फोर्समध्ये असताना दीपक वसंत साठे यांनी sword of Honor मिळवले होते. तसेच आठ शौर्य पदक देखील जिंकले होते, असेही निला साठे यांनी सांगितले. अपघात होण्याच्या काही दिवसा आधीच मुलाशी फोनवर संवाद झाला होता, त्यावेळी त्याने ‘आई कोरोना असल्याने जास्त बाहेर जाऊ नको’, असे बजावले होते, असेही त्यांनी सांगितले. तसेच दीपक यांचे वडील लष्करात कर्नल पदावर कार्यरत होते आणि 30 वर्ष देशसेवा केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून दोन्ही मुले सैन्यात भरती झाले होते, असेही त्यांनी सांगितले. फिरोझपूर येथे 1981 ला झालेल्या अपघातात मोठा मुलगा विकास हुतात्मा झाला, असेही निला साठे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या