१० खलाशांसह केरळची नौका सुखरुप किनाऱ्यावर

प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । मालवण

मालवण-वेंगुर्ला किनारपट्टीवर खोल समुद्रात इंजिन बंद पडल्याने केरळ येथील ‘किंगफिशर’ ही मासेमारी नौका १० खलाशांसह शुक्रवारी रात्री समुद्रात भरकटली. दरम्यान याबाबत माहिती मिळताच मालवण पोलिसांनी मध्यरात्री समुद्रात राबवलेल्या तब्बल पाच तासाच्या शोध मोहिमेनंतर नौकेसह १० खलाशांना रात्रौ १२ वाजता सुखरुप मालवण बंदरात आणले. इंजिन दुरुस्त झाल्यानंतर नौका शनिवारी दुुपारी (१४) केरळच्या दिशेने रवाना झाली.

शुक्रवारी ७ वाजण्याच्या सुमारास इंजिन बंद पडुन नौका बंद केली. या बाबत खलाशांकडून कोस्टगार्ड व पोलीस कंट्रोलला देण्यात आली. त्यानुसार रात्रौ उशिरापर्यंत पोलिसांची स्पीडबोट सिंधु पाच, अप्सरा यांच्या सहाय्याने पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, रुपेश सारंग, विल्सन डिसोजा, भाबल, तसेच सागरी पोलीस साठे, टेकाळे व अन्य कर्मचारी यांच्याकडून भरकटलेल्या बोटीचा शोध सुरु होता. रात्र झाल्याने शोध कार्यात अनेक अडचणी येत होत्या. बोटीचे नेमके ठिकाण स्पष्ट हित नव्हते.

अखेर मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास २५ ते ३० वाव खोल समुद्रात बोट सापडली. मात्र बोटीचे इंजिन बंद असल्यामुळे पोलिसांच्या पावणाई या गस्ती नौकेला त्याठिकाणी बोलावून बंद नौका त्याला बांधून मालवण बंदरात आणण्यात आली. इंजिन दुरुस्तीनंतर शनिवारी नौका पुन्हा केरळच्या दिशेने रवाना झाली,अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी दिली.