आमदाराने विधानसभेत आणले ग्रेनेड आणि…

सामना ऑनलाईन। तिरुअनंतपुरम

केरळ विधानसभेत बुधवारी काँग्रेस आमदार हातात ग्रेनेड घेऊन प्रकटल्याने एकच गोंधळ उडाला. कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही आमदाराने विधानसभेत ग्रेनेड आणलेच कसे असा प्रश्न सर्वांना पडला. तेवढ्यात आमदाराने हात उंचावत ते ग्रेनेड विधानसभा अध्यक्षांना दाखवले यामुळे अनेकांच्या काळजात धस्स झालं. मात्र दुसऱ्याच क्षणी याच ग्रेनेडचा वापर गेल्या आठवड्यात पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना हुसकावण्यासाठी केला असल्याचं सांगत आमदाराने ग्रेनेडच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उभारलं. तेव्हा कुठे सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. थिरुवंचूर राधाकृष्णन असे या आमदाराचे नाव आहे.

राधाकृष्णन यांना पोलिसांना पुरवण्यात येणारा ग्रेनेडचा दर्जा किती निकृष्ट आहे हे समोर आणायचे होते. यासाठीच ते ग्रेनेड घेऊन थेट विधानसभेत आले. मुदत संपलेले ग्रेनेड पोलिसांना देण्यात येतात. जे आरोग्यासाठी हानिकारक आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला. आपला हा मुद्दा अध्यक्षांना पटवून देण्यासाठी त्यांनी आठवड्याभरापूर्वी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी वापरलेले ग्रेनेड सोबत आणले होते. त्यांच्या या कृत्यामुळे विधानसभेत एकच गोंधळ उडाला. राधाकृष्णन विधानसभेतच ग्रेनेड टाकणार अशी भीती वाटल्यांने अनेकांचे हातपाय थरथरु लागले. तर काहीजणांनी विधानसभेत ग्रेनेड का आणले यावरुन एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनीदेखील यावर आक्षेप घेत ही गंभीर बाब असल्याचे म्हटले. त्यानंतर राधाकृष्णन यांनी विधानसभेत उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याकडे ग्रेनेड सुपूर्द केले. त्यानंतर कुठे सगळ्यांनी मोकळा श्वास घेतला.

दरम्यान, याप्रकरणाची चौकशी कऱण्याबरोबरच राधाकृष्णन यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी दिले आहे.