‘गुपचूप’ भानगड उजेडात आली, 10 वर्षांपूर्वी गायब झालेली मुलगी सापडली

केरळच्या नेमारा येथील अयीरुर येथून 2010 साली ही तरुणी अचानक घरातून बेपत्ता झाली. तेव्हा ती 18 वर्षांची होती. तिचा बराच शोध घेऊनही ती सापडली नाही. याप्रकरणी तरुणीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याने तपास सुरु होता.  मात्र अनेक वर्ष ती न सापडल्याने पोलिसांनी ती केस बंद केली होती. मात्र मंगळवारी अचानक ती तरुणी सापडली. अनेक वर्ष ही तरुणी आई वडिल ज्या गावात त्याच्या शेजारच्याच गावात ती प्रियकरासोबत राहत होती. मात्र तरिही ती कुणालाच दिसली नाही. याबाबत तिने जो खुलासा केला तो अत्यंत धक्कादायक आहे.

या तरुणीचे गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. घरातील त्यांच्या लग्नाला तयार होणार नाहीत म्हणून ती त्याच्यासोबत पळून गेली. ती प्रियकरासोबत तिच्या गावाजळीलच करक्तूंबर गावात एक खोली घेऊन राहत होती. मात्र गेल्या दहा वर्षात ती त्या खोलीतून फक्त शौचाला जाण्यासाठीच बाहेर पडायची. ते देखील रात्रीच्या अंधारात. इतर वेळी तिचा प्रियकर घराला बाहेरून कुलूप लावून जायचा. शौचाला जाण्यासाठी बाहेर पडायची तेवढाच काय तो तिचा बाहेरच्या जगाशी संबंध यायचा. अन्यथा तिने खोलीत स्वत:ला कोंडून घेतले होते. तिचा प्रियकर तिला जीवनावश्यक वस्तूंबरोबरच तिच्या खाण्यापिण्याची काळजी घेत होता. त्यामुळे गावाच्या जवळ राहूनही दोघांच्याही घरच्यांना याबाबत काहीच पत्ता लागला नाही.

तीन महिन्यांपूर्वी दोघेही नेमारा येथील विठानासरी गावात भाड्याच्या घरात राहायला गेले. त्याचवेळी करंक्तंबूर गावातील एक तरुण बेपत्ता असल्याचे समजले. गावकऱ्यांनी व तरुणाच्या भावाने शोधाशोध केली असता तरुणाच्या भावाला तो सापडला. मात्र त्याच्यासोबत दहा वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली एक तरुणी देखील होती. त्याबाबत त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांना ताब्यात घेतले.

दोघांना न्यायालयात उभे केले असता तरुणी सुज्ञ असल्याने तिला प्रियकरासोबत राहण्याची न्यायालयाने परवानगी दिली. नातेवाईकांनीही त्यासाठी विरोध केला नाही. मात्र एवढी वर्ष एका खोलीत तरुणी राहत होती आणि त्याचा कोणालाच थांगपत्ता लागला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच वरिष्ठ अधिकारी याप्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या