बनावट व्हिसा, विमान तिकीट देऊन विमानतळावर पाठवले; केरळच्या भामटय़ाने 11 जणांना फसवले

कुवेतमध्ये एका खासगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देतो अशी बतावणी करत तामीळनाडूतील 11 बेरोजगारांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा चुना लावणाऱ्या केरळमधील एका भामटय़ाला चेंबूर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत.

मोहम्मद खालदू (52) असे त्या आरोपीचे नाव आहे. तामीळनाडूतील 11 जण नोकरीच्या शोधात असल्याची माहिती खालदू याला मिळाली होती. त्याआधारे त्याने मोहम्मद समशूद या नावाने त्या सर्वांना संपर्क साधून कुवेतमधील किटको कंपनीत नोकरी मिळवून देतो असे त्यांना सांगितले. त्यानंतर त्या सर्वांना खालदूने मुंबईत बोलावले. चेंबूर येथील एका लॉजमध्ये नेऊन प्रत्येकाकडून 15 हजार रुपये व त्यांचे पासपोर्ट घेतले. मग सर्वांची चेंबूर परिसरातील एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून सर्वांना एक महिन्यानंतर पुन्हा मुंबईत येण्यास सांगून तामीळनाडूला जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे महिनाभरानंतर सर्व जण मुंबईला आले. त्यावेळी खालदूने प्रत्येकाकडून उर्वरित 35 हजार रुपये घेतले आणि सर्वांना पासपोर्ट, व्हिसा आणि विमानाचे तिकीट देऊन कुवेतला जाण्यास सांगितले. खालदूच्या सांगण्यावरून 11 पैकी 8 जण दुसऱ्या दिवशी कुवेतला जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेले, तर उर्वरित तिघे मागाहून कुवेतला जाणार होते. दरम्यान, आठ जण विमानतळावर गेल्यावर त्यांच्या पासपोर्टला असलेला व्हिसा आणि कुवेतचे विमान तिकीट बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे मोहम्मद समशुद नामक व्यक्तीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच सर्वांनी परिमंडळ- 6 चे उपायुक्त हेमराज राजपूत यांच्याकडे जाऊन तक्रार केली.

दरम्यान, याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून प्रभारी वरिष्ठ निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. एकनाथ देसाई, उपनिरीक्षक स्वप्नील शिंदे तसेच घुले, नार्वेकर, लावंडे, भोसले, देवा कदम आदींच्या पथकाने तपास करून मोहम्मद खालदू याला चौकशीला बोलावले. चौकशीत खालदूने 11 जणांची फसवणूक केल्याचे स्पष्ट होताच त्याला अटक करण्यात आली. त्याने आणखी कोणाला अशाप्रकारे फसविले आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत.