केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कोट्टक्कलहून पदपराम्बुला येथे शुक्रवारी जात असताना वाटेतच कारला अपघात झाला. अपघात होताच कारमधील एअरबॅग्ज उघडल्या. यामुळे कारमधील कुटुंबीय वाचले. मात्र एअरबॅग्जमुळे श्वास गुदमरून दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारने टँकरला धडक दिली. अपघात होताच कारमधील एअरबॅग्ज उघडल्या. चिमुकली आईसोबत ड्राईव्हरच्या शेजारील सीटवर बसली होती. एअरबॅग्ज उघडताच त्याखाली चिमुकली दबली गेली. यामुळे श्वास गुदमरला आणि तिचा मृत्यू झाला.
कारमध्ये चिमुकलीच्या आईसह अन्य चौघेजण होते. सर्वजण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.