कठोर परिश्रमांतून गरिबीवर मात, मिळालं १९ लाखांचं पॅकेज

सामना ऑनलाईन । नागपूर

केरळच्या एका छोट्याशा गावातून आलेल्या जस्टीन फर्नांडिस या २७ वर्षीय तरुणाने परिस्थितीवर मात करत घवघवीत यश संपादन केले आहे. इंडियन इन्स्टिटियूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरचा विद्यार्थी असलेल्या जस्टीनला आतापर्यंतच्या सर्वात जास्त पगाराचं म्हणजेच १९ लाखांचं पॅकेज देण्यात आलं आहे. घरची परिस्थिती गरीब असल्याने त्याने आधीपासूनच प्रचंड मेहनत केली होती. हैदराबाद येथील व्हॅल्यू लॅबने चांगले पद देत तब्बल १९ लाखांचे पॅकेज आता जस्टीनला दिल्याने त्याच्या मेहनतीला फळ मिळालं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतच वृत्त दिले आहे.

जस्टीनने घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्याचे कुटुंब हे कित्येक वर्षापासून शिवणकाम करत आहे. त्याचे आजोबा पेशाने शिंपी होते. तसेच त्यांचाच व्यवसाय पुढे जस्टीनच्या वडिलांनी केला. मात्र त्यामध्ये त्यांचे कुटुंब चालवणे शक्य नव्हते. तसेच त्याच्या कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी सरकारी अनुदानावर अवलंबून राहावे लागत असे. परिस्थिती गरिब असल्याने केवळ शिक्षणच यांना या परिस्थितीतून बाहेर काढू शकत असल्याने जस्टीनच्या मावशीने त्यांना खूप मदत केली. तसेच जस्टीन आणि त्याच्या बहिणीचे शिक्षण बंद होऊ नये यासाठी बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च केला. जस्टीनने बीटेकचे शिक्षण त्रिवेंद्रमच्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातून केले आहे. शिक्षणासाठी लागणारा खर्च त्याने त्याला मिळालेल्या शिष्यवृत्तीतून केला आहे. आयआयएमएनच्या आधी जस्टीनने दोन वर्ष एका सॉफ्टवेअर कंपनीत काम केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या