माळरानात फुलवली केशराची शेती, आदिवासी शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग

810

सामना ऑनलाईन, कळवण

तालुक्यातील बोरदैवत येथील आदिवासी शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत वेगळा प्रयोग करीत माळरानात चक्क केसरची शेती फुलवली आहे. सध्या कांदा, टोमॅटोसारख्या पिकांना रास्त भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत असताना बोरदैवतचे शेतकरी चिंतामण अर्जुन पवार यांनी मुलगा अनिल व भाऊ राजेंद्र पवार यांची मदत घेत अर्धा एकरात केसरची शेती फुलवली आहे. विशेष म्हणजे या पिकाविषयी कुठलीही प्राथमिक माहिती नसतानाही त्यांनी हे उत्पन्न घेतले.

प्रारंभी मध्य प्रदेशातल्या रतलामच्या शेतकऱ्याची मुलाखत वाचल्यानंतर त्यांना या पिकाची माहिती मिळवण्याची जिज्ञासा वाटू लागली. महाराष्ट्र शासनाच्या किसान हेल्पलाईनच्या माध्यमातून त्यांनी मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांशी संपर्क केला व पिकाविषयी माहिती मिळवीत दहा हजार रुपयात शंभर ग्रॅम अमेरिकन हायब्रिड केशर या जातीची बियाणे मिळविले व कोकोनट ट्रेमध्ये त्याची रोपे तयार करून अर्धा एकर क्षेत्रात त्याची लागवड केली.

केशरची शेती साधारणतः कश्मीर, मध्य प्रदेश, राजस्थान येथे केली जाते. केशर लागवडीचा नाशिक जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे समजते. साधारणतः पाच महिन्यात येणाऱ्या या पिकास अर्धा एकरात तीस हजार रुपये खर्च येऊन जवळ जवळ पंचवीस किलो केशरचे उत्पन्न मिळाले आहे. याला अंदाजे चाळीस हजार ते एक लाख रुपये किलोचा भाव मिळण्याचा अंदाज आहे. केशरची प्रतवारी ठरवण्यासाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत नमुना तपासणीसाठी पाठवावा लागतो व तेथील अहवालानुसार भाव ठरत असल्याचे राजेंद्र सावळीराम पवार यांनी सांगितले.

असे घेतात पीक
केशरची झाडे पाच फुटांपर्यंत वाढतात व पाच महिन्यात उत्पन्न मिळते. या पिकास साधारणतः थंड वातावरण लागते व सप्टेंबर ते मार्च ही वेळ त्यासाठी उत्तम असते. करडई वर्गातील पीक असून सऱ्या पाडून लागण करता येते. केशरचे फूल उमलल्यानंतर पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाचे असते व तिसऱ्या दिवशी त्यास केशरी रंग येतो त्यावेळी त्वरित फूल तोडणी करावी लागते. यात वेळेला फार महत्त्व असते. तसेच कुठलेही रासायनिक खत न वापरता केशर पिकवण्यात आल्याची माहिती अनिल पवार यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या