भगवा कडाडला! शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

29

सामना प्रतिनिधी । अकलूज

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भगवा कडाडला आहे. भगव्या डाळींबाला प्रती किलो पाचशे रुपयांचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दोन आठवड्यापूर्वी याच डाळींबाला विक्रमी २५० रुपये दर मिळाला होता. रविवारी हा विक्रमही मोडीत निघाला. गिरवी (ता. माळशिरस) येथील शत्रुघ्न गेजगे या शेतकऱ्याच्या शेतातील डाळींबाला प्रप्ती किलो ५०० रुपयांचा दर मिळाला आहे.

सहा महिन्यांपूर्वी डाळींबाला ७० ९० रुपये प्रती किलो असा दर सुरू होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. केळी, डाळींब, द्राक्षे, कलींगड, टरबूज या फळांनीही दराच्या बाबतीत मान टाकली होती. तसेच अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे चारही बाजून शेतकरी अडचणीत आला होता. मात्र अकलूज बाजार समितीमध्ये डाळींबाला मिळत असलेल्या दरामुळे सध्या समाधानकारक वातावरण आहे.

फेब्रुवारी महीन्यापासून बाजार समितीमध्ये डाळींबाच्या दरामध्ये वाढ होत आहे. १५ दिवसांपूर्वी झालेल्या लिलावामध्ये २५० रुपये दर झाल्याने इंदापुर, पंढरपूर, सांगोला, माढा, माळशिरस भागातून डाळींबाची आवक वाढली. उत्तम प्रतीचा माल बाजार समितीमध्ये येऊ लागला. चांगल्या दर्जाचा माल बाजारात आल्याने दिल्ली, कानपुर, बंगाल, मुझफ्फरपुर आदी भागातील व्यापाऱ्यांनी अकलूज मार्केटकडे धाव घेतली. चांगला माल खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा वाढल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा चांगला दर मिळत आहे. रविवारी डाळींबाच्या दराने सगळे विक्रम मोडीत काढत ५०० रुपये दर मिळवला.

आपली प्रतिक्रिया द्या