डॉ. शांताराम केतकर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रत्नागिरी जिह्यातील ज्येष्ठ स्वयंसेवक डॉ. शांताराम हरी तथा बापूराव केतकर यांचे वृद्धापकाळाने नुकतेच  निधन झाले. वयाच्या नवव्या वर्षापासून बापूरावांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. वैद्यकीय पेशा सांभाळताना डॉ. बापूराव केतकर हे सेवाभावी वृत्तीने काम करत असत. मिऱया गावामध्ये त्यांनी सर्वप्रथम दवाखाना सुरू केला. त्यानंतर हातखंबा येथे रुग्णालय सुरू केले. त्याकाळात डॉक्टर बापूराव केतकर घरोघरी जाऊन सेवाभावी वृत्तीने रुग्णांवर उपचार करत असत. वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत त्यांनी वैद्यकीय सेवा केली. सामजिक कामातून अनेक गरजूंना ते मदत करत. १९७२ मध्ये हातखंबा जिल्हा परिषद गटातून ते अपक्ष निवडून आले होते. वयाच्या नवव्या वर्षापासून बापूराव केतकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून काम सुरू केले होते. १९९२ ते १९९५ या काळात संघप्रचारक म्हणून काम करताना तीन वर्षे त्यांनी देशातील संघाच्या विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. त्यावर आधारित ‘सेवासरितांचा अमृतकुंभ’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. या पुस्तकाच्या इंग्रजी आणि हिंदी आवृत्त्याही निघाल्या. १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात नाशिक येरवडा येथील तुरुंगात डॉ. बापूराव केतकर यांनी ५८ महिन्यांचा तुरुंगवासही भोगला. हातखंबा येथील एका गरीब मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेताना पुढे त्या मुलीचे कन्यादानही त्यांनी केले. काही वर्षांपूर्वी डॉ. बापूराव केतकर यांना कऱहाडे ब्राह्मण संघाचा ‘धन्वंतरी’ हा पुरस्कारही मिळाला.