खडकवासला वितरिका क्र. ३६ चौकशीच्या फेऱ्यात

35
संग्रहीत

सामना प्रतिनिधी । भिगवण

इंदापूर आणि बारामती तालुक्यातील गावांना वरदान ठरू शकणाऱ्या खडकवासला वितरिका क्र. ३६चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकला होता. वितरिकेचे अंदाजपत्रक बोगसरीत्या बनवले असून त्याची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास मंडळाच्या विशेष अधिक्षकांनी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंतांना हे आदेश दिले आहेत.

शेतकऱ्यांनी खडकवासला वितरिका(चारी) क्र.३६ च्या कामाची तक्रार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. त्यावेळी प्रकरणाची योग्य प्रकारे तपासणी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. कृष्णा खोरे महामंडळाचे अधिक्षक यांनी मुख्य अभियंता यांना तसा पत्रव्यवहार केला आहे. जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशावरून कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या विशेष अधिकाऱ्यांनाही मुख्य अभियंता यांना तीनवेळा पत्रव्यवहार केला आहे. २५ मे,४ जुलै आणि २८ ऑगस्ट २०१७ या वेळी हा पत्रव्यवहार झाला. मात्र या चौकशीलाही वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

काय आहे प्रकरण?
इंदापूर व बारामती तालुक्यांच्या सीमेवरील सिद्धेश्वर निम्बोडी, पारवडी, मदनवाडी या गावांतील शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता वितरिका क्र. ३६ ची निर्मिती झाली. मात्र प्रत्यक्षात या वितारीकेचे काम निकृष्ट झाल्याने ३० वर्षांत एकदाही पाणी आले नाही. अनेक वेळा शेतकऱ्यांनी यासाठी आंदोलने केली. आंदोनलामुळे चारीच्या कामासाठी ५ कोटी ७६ लाख मंजूर झाले. चारीचे काम चार टप्प्यात करावयाचे असून पहिल्याच टप्प्यातील काम बोगस अंदाजपत्रक बनवून केल्याचा आरोपकरण्यात आला होता. त्यानुसार जलसंपदा खात्याने या कामाची तीन वेळा चौकशी केली. मात्र या चौकाशांमध्येदेखील गौंडबंगाल असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे वितरिका क्र.३६ ची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या