तुफान पावसामुळे खडकवासला ओव्हरफ्लो, भिडे पूल पाण्याखाली

112

अमोल कुटे, पुणे

कोकण किनारपट्टीप्रमाणेच पुणे जिल्ह्यातही चांगला पाऊस सुरू असून या पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीनही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.  खडकवासला धरणातून सकाळी सात वाजता सुमारे २३ हजार क्युसेस पाणी सोडण्यात आले. यामुळे मुठा नदीला पूर आला आहे. त्यामुळे त्यामुळे सिंहगड रस्ता परिसर आणि नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेता नदीकाठच्या सोसायट्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दिवसभर धो धो पाऊस पडल्याने तीनही धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला येथे २४ तासात ३७ मिलिमीटर, पानशेत ५७ मिलिमीटर,वरसगाव इथे ५६ मिलिमीटर तर टेमघर येथे ६० मिलिमीटर पाऊस पडला आहे. पानशेतमधून सुमारे रात्री ४ हजार क्यूसेक पाणी सोडले जात होते. ते सकाळी कमी करून ९९० क्यूसेक वेगाने सोडण्यात येत होते.  वरसगावमधून पहाटे ३५५२ क्यूसेक पाणी सोडण्यास सुरूवात केली. वरच्या धरणातून सोडलेले पाणी आणि खडकवासला परिसरात पावसाचा अधिक जोर असल्याने खडकवासला धरणात आता तब्बल २४ हजार क्यूसेक पाणी जमा होत आहे. या धरणातून मुठा नदीत २३ हजार क्यूसेक व कालव्यातून एक हजार असे २४ हजार क्यूसेक पाणी सोडले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या