सारवासारवीची भूमिका

223

<< दीपक काशीराम गुंडये >>
खादी ग्रामोद्योग मंडळाची दिनदर्शिका तसेच डायरीवर यंदा महात्मा गांधी यांच्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आधुनिक चरख्यासह छबी झळकली गेल्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. खादी ग्रामोद्योग मंडळाने छायाचित्र बदलाबाबत स्पष्टीकरण देताना मोदींमुळेच खादीचा खप वाढल्यामुळे त्यांची छबी छापणे उचित असल्याचे म्हटले होते. भाजपच्या एका मंत्र्याने तर खादीसाठी पंतप्रधान मोदी हे महात्मा गांधी यांच्यापेक्षा अधिक मोठे ब्रॅण्ड आहेत असे सांगतानाच गांधीजींना हळूहळू नोटांवरूनसुद्धा हटवले जाईल असे वक्तव्य केले होते. भाजपने ही पक्षाची भूमिका नसल्याचे सांगितले ही गोष्ट वेगळी. पंतप्रधान कार्यालयाने तर दिनदर्शिका व डायरीवर गांधीजींची छबी असलीच पाहिजे असे बंधन वा नियम अजिबात नाही असा युक्तिवाद करताना गांधीजींच्या फोटोचा वाद निराधार आणि अनावश्यक आहे असे स्पष्ट केले होते. त्याला पुष्टी देताना१९९६, २००२, २००५, २०११, २०१२, २०१३, २०१६  या वर्षांतील दिनदर्शिकांवर गांधीजींचे छायाचित्र नव्हते याकडे लक्ष वेधले होते. म्हणजे एकप्रकारे या बदलास संमतीच होती असा अर्थ घेतल्यास त्यात वावगे वाटू नये. परंतु विरोधाचा सूर व धार तीव्र होताच याच पंतप्रधान कार्यालयाने ‘मोदी यांचे छायाचित्र वापरण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे परवानगी मागण्यात आली नव्हती’ असे म्हटले आहे. या प्रकाराबाबत पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली असून या बदलास ते राजी नसल्याची माहितीही पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या दिनदर्शिकेवरील छबीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया समोर आल्या असत्या तर पंतप्रधान कार्यालयाला नंतरचा खुलासा करावाच लागला नसता असेच म्हणावे लागेल. त्यामुळेच पंतप्रधान कार्यालयाची सध्याची भूमिका ही वादापासून अलिप्त राहण्यासाठी केलेली सारवासारव आहे असे वाटायला बराच वाव आहे.

आपली प्रतिक्रिया द्या