कृपाशंकरांप्रमाणेच खडसेंनाही एसीबीची क्लीन चिट

सामना प्रतिनिधी । मुंबई

बेहिशेबी मालमत्ता बाळगल्या प्रकरणी विशेष न्यायालयाने काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांना फेबुवारीतच क्लीन चिट दिल्यानंतर त्यापाठोपाठ आता भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप असलेले माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) क्लीन चिट दिली आहे. खडसे कुटुंबीयांनी भोसरी जमीन खरेदीचा केलेला व्यवहार हा कायदेशीर असून यासाठी एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर केल्याचा पुरावा सापडला नसल्याचा अहवाल एसीबीने विशेष न्यायालयाकडे पाठविला आहे.

उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्या प्रकरणी कृपाशंकर यांच्यावर विशेष न्यायालयात खटला सुरू होता. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कृपाशंकर आणि त्यांच्या नातेवाईकांविरोधात दाखल केलेल्या आरोपत्रावर सुरू असलेल्या खटल्यात त्यांना क्लीन चिट देण्यात आली. कृपाशंकर यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर आता भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात चौकशी सुरू असलेले एकनाथ खडसे आणि त्यांच्या नातेवाईकांनाही एसीबीने क्लीन चिट दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यासंदर्भातील अहवाल विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे.टी. उटपट यांच्याकडे शुक्रवारी सादर केला. एकनाथ खडसे यांनी जमीन खरेदी प्रकरणात आपल्या पदाचा कोणताही गैरवापर केलेला नाही. एकनाथ खडसे आणि अन्य संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल करण्याबाबत कोणताही पुरावा सापडलेला नाही. या प्रकरणात २० लोकांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या असून ६०० कागदपत्रांची छानणी करण्यात आली आहे. यावरून ही जमीन खरेदी कायदेशीर असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्याचे या अहवालात नमूद केल्याची माहिती एसीबीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रसाद हसबनीस यांनी माध्यमांना दिली.

काय आहे प्रकरण…

खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे क जाकई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी येथील एमआयडीसीने अधिसूचित केलेला भूखंड सर्व्हे क्र. ५२/२ अ हा अब्बास उकानी यांच्याकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केला. या भूखंडाची किंमत ३१ कोटी ११ लाख रुपये असताना अवघ्या तीन कोटी रुपयांत बाजारमूल्य कमी दाखवून खरेदी करण्यात आल्या प्रकरणी संशय व्यक्त करण्यात आला. यावरून भूखंड घोटाळा झाला असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर या प्रकरणी सरकारने चौकशीचे निर्देश दिले. त्यानंतर खडसे यांना महसूल मंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले.

खडसे काय म्हणाले…

खोटे आरोप करून मला बदानाम करण्याचा प्रयत्न झाला होता. मी निर्दोष असल्याचा मला विश्वास होता. अनेक कटू अनुभव आले. कृतघ्न माणसं पाहिली असली तरी कृतज्ञ माणसांची संख्या अधिक आहे. ज्यांनी माझ्यावर आरोप केले ते तोंडघशी पडले आहेत.

मुख्यमंत्री म्हणतात…

खडसे यांच्या क्लीनचिटबाबत मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, एसीबीचा अहवाल पुणे येथील न्यायालयात सादर झाला आहे. त्यामुळे हा अहवाल कोर्ट स्वीकारते की नाही हे पाहावे लागेल.

आधी कोर्टाचा निर्णय येऊ देत

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यावर आधी कोर्टाचा निर्णय होऊ देत असे सांगत एसीबीचा नेमका अहवाल काय आहे, याची माहिती अद्याप कळलेली नाही. पण खडसे यांना क्लीन चिट मिळाल्यास अन्य भाजप कार्यकर्त्यांप्रमाणे मला आनंदच होईल. सार्वजनिक जीवनात काम करताना राजकीय व्यक्तींना अनेक दिव्यांतून जावे लागते. त्याप्रमाणेच खडसे यांनाही गेली दोन वर्षे खडतर काळातून जावे लागले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दमानियांची उच्च न्यायालायात धाव

मागील वर्षी ऑगस्ट २०१७मध्येच मी खडसेंच्या विरोधातील सर्व पुरावे एसीबीकडे दिले होते. मात्र तरीही भाजप सरकारच्या दबावामुळेच एकनाथ खडेसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून क्लीन चिट देण्यात आल्याचा आरोप करतानाच याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली.

पुनर्वसनाचा मार्ग खडतर!

मंत्रिमंडळ विस्तार करून त्यामध्ये पुन्हा एकनाथ खडसे यांचा समावेश करणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन बाळगतले आहे. तर चंद्रकांत पाटील यांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यातच अंजली दमानिया यांनी क्लीन चिटविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी केल्याने एकनाथ खडसे यांच्या पुनर्वसनाचा मार्ग अधिक खडतर झाला आहे.

माझ्यावर आरोप करणारे तोंडघशी पडले
– एकनाथ खडसे
40 वर्षांच्या कारकिर्दीत माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नव्हता. कोणत्याही पक्षाने माझ्या चौकशीची मागणी केली नव्हती. मात्र काही सुपारीबाज लोकांनी ही मागणी केली. मंत्रिमंडळाचा विस्तार आला की आरोप करायचे? पण चौकशीतून सत्य समोर आलं. आरोपात तथ्य नव्हते. मी निर्दोष असल्याचा आनंद असून ज्यांनी माझ्यावर आरोप केले ते तोंडघशी पडले. अनेक कटू अनुभव आले. कृतघ्न माणसं पाहिली असली तरी कृतज्ञ माणसांची संख्या अधिक आहे. या अनुभवातून गेलो तो मनात ठेवून यापुढेही पक्षासाठी काम करीत राहणार, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.