खालापूर, म्हसळा, तळा, पोलादपूर, माणगाव रायगडातील पाच नगरपंचायतींच्या निवडणुकांचे बिगूल वाजले

रायगड जिह्यातील खालापूर, म्हसळा, तळा, पोलादपूर आणि माणगाव या पाच नगरपंचायतींच्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 27 नोव्हेंबरला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. प्रत्येक नगरपंचायतीच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता प्रत्येकी 17 प्रभागांसाठी ही आरक्षण सोडत निघणार आहे. या आरक्षण सोडतीवरच इच्छुकांचे भवितव्य अवलंबून असल्याने सर्वांचे लक्ष लागले असून त्यानंतर खऱया अर्थाने गुलाबी थंडीत राजकीय वातावरण तापायला सुरुवात होणार आहे.

रायगड जिह्यात म्हसळा, माणगाव, तळा, पोलादूर, खालापूर या पाच नगरपंचायत स्थापन झाल्या आहेत. पाचही नगरपंचायतींची मुदत ही संपत आली आहे. त्यामुळे पाचही नगरपंचायतींच्या प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. उद्या 27 नोव्हेंबर रोजी नगरपंचायत कार्यालयात आरक्षण सोडत काढली जाणार आहे. याबाबतची तयारी नगरपंचायत प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर प्रभाग रचना आणि पुढील निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.

एकादशीचा उपवास फळणार की…
एकादशीच्या दुसऱया दिवशीच आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या प्रभागात आपल्याच जातीचे आरक्षण पडणार की तो इतर जातींसाठी, महिला प्रवर्गासाठी आरक्षित होणार याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी गुरुवारी एकादशीचा अनेकांनी उपवासही केला असून पांडुरंगाला साकडेही घातले आहे. त्यामुळे एकादशीचा उपवास फळणार की नाही हे उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल.

आपली प्रतिक्रिया द्या