लंडनमधील हिंदुस्थानी उच्चायुक्तालयाबाहेर खलिस्तान समर्थकांची निदर्शने

khalisthani

 

खलिस्तान समर्थकांनी सोमवारी लंडनमधील हिंदुस्थानी उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने केली. ब्रिटीश सुरक्षा दलांना त्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते आणि निदर्शकांना उच्चायुक्तालयाच्या रस्त्यावरून प्रतिबंधित करण्यात आले होते.

यूकेमधील हिंदुस्थानी उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना खलिस्तानी अतिरेक्यांनी स्कॉटलंडच्या ग्लासगो येथील गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखल्यानंतर काही दिवसांनी हा निषेध करण्यात आला. हिंदुस्थानने या घटनेची माहिती ब्रिटीश सरकारला दिली आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

ज्या गुरुद्वाराने दोराईस्वामींना प्रवेश नाकारला होता, त्यांनीही या कृत्याचा निषेध करणारे निवेदन जारी केले आणि या घटनेला ‘शिखांच्या प्रार्थनास्थळाच्या शांततापूर्ण कामकाजात व्यत्यय आणण्यासाठी केलेले वर्तन’ असल्याचे म्हटले.

यूकेच्या इंडो-पॅसिफिक मंत्री, अॅनी-मेरी ट्रेव्हलियन यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि यावर ‘चिंता’ व्यक्त केली. तसेच विदेशी राजदूतांची सुरक्षा ‘अत्यंत महत्त्वाची आहे आणि यूकेमधील आमची प्रार्थनास्थळे सर्वांसाठी खुली असणे आवश्यक आहे’.

जुलैमध्ये हिंदुस्थानी उच्चायुक्तालयाबाहेर खलिस्तान समर्थकांनी असाच निषेध केला होता.