ऐतिहासिक खांबतळ्याला शेवाळाचा विळखा

सामना ऑनलाईन । खेड

खेड शहराच्या दृष्टीने एँतिहासिक महत्व असलेल्या खांबतळ्यात मोठय़ा प्रमाणात शेवाळ तयार झाले असल्याने तळ्याचे विद्रुपीकरण झाले आहे. नगरपालिका प्रशासनाने तळ्यातील हे शेवाळ तात्काळ काढावे अन्यथा शेवाळाचे रुपांतर जलपर्णीत होवून पुन्हा एकदा हे ऐतिहासिक तलाव जलपर्णीच्या विळख्यात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नगरपालिका कार्यालयापासुन केवळ हाकेच्या अंतरावर असलेले खांब तळे खरतर खेड शहराचे वैभव आहे. परंतू नगरपालिका प्रशासनाकडून तळावाची आवश्यक ती देखभाल केली जात नसल्याने खांबतळ्याची दुरवस्था झाली आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सरोवर संवर्धन योजनेतंर्गत तलावाच्या सुशोभिकरणासाठी आठ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतला आहे. त्यातील पहिला हप्ता नगरपालिकेला प्राप्त झाल्यावर तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सुरु करण्यात आले. परंतू हे काम अपुर्णावस्थेत असल्याने तळ्याचे सौंदर्य खुळण्याऐवजी लोप पावत चालले आहे.

तलावातील पाण्यावर शेवाळ तयार होणे हे तळावातील पाणी दुषीत होण्याचे संकेत आहेत. २०१२ साली अशाच प्रकारे तलावातील पाणी दुषीत झाले होते. या दुषीत पाण्यावर सुरवातीला शेवाळ जमा झाले आणि त्याचे रुपांतर विषारी जलपर्णीत झाले. ही जलपर्णी इतकी फोफावली की जलपर्णीमुळे तळ्यातील मासे मोठय़ा प्रमाणात मरु लागले. नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात प्रसारमाध्यमांनी टिकेची झोड उठवल्यानंतर प्रशासनाने तळ्यातील पाण्यावर वाढलेली जलपर्णी काढण्याचा प्रयत्न सुरु केला. यासाठी लाखो रुपयांचा चुराडा करण्यात आला. मात्र पाण्यावर वाढलेली जलपर्णी पुर्णपणे नष्ट करणे प्रशासनाला शक्य झाले नाही. अखेर तळ्यातील पाण्याचा उपसा करण्यात आला आणि जलपर्णीचा नायनाट झाला.

आता पुन्हा एकदा तळ्यातील पाण्यावर मोठय़ा प्रमाणात शेवाळ जमा झाले आहे. यामुळे तळ्याचे नैसर्गिक सौंदर्य झाकाळून गेले आहे. शेवाळामुळे पुन्हा एकदा २०१२ ची पुनरावृती होवून खांबतळ्याला पुन्हा एकदा जलपर्णीचा विळखा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर तळ्यातील मासे पुन्हा मरण्याची भिती व्यक्त होत आहे. तळ्याच्या सुशोभिकरणासाठी शासनाकडून करोडो रुपयांचा निधी मंजूर असतानाही केवळ राजकिय अनास्थेमुळे तळ्याच्या सुशोभिकरणाचे काम रखडले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या