खामगाव जालना रेल्वेमार्गाचा लग्नातील देखावा ठरला आकर्षण, चर्चेचा विषय

223

राजेश देशमाने, बुलढाणा

स्वातंत्र्यप्राप्तीपासून खामगाव जालना रेल्वे मार्ग अपेक्षित उपेक्षित आहे. याच रेल्वेमार्गाचा देखावा चिखलीचे जीवन बाहेती यांनी आपल्या मुलीच्या लग्नात आज २१ डिसेंबर रोजी उभा करुन संपूर्ण वर्‍हाडी मंडळीसह उपेक्षित सर्वच पक्षाच्या राजकिय नेत्याचे लक्ष वेधून घेतले संपूर्ण लग्नात याच देखाव्याची चर्चा होती.

चिखली येथील एक कलात्मक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून जीवन बाहेती यांचे नाव आहे. चंदनश्री डेकोरेटर्स या नावाने त्यांचा व्यवसाय आहे. प्रत्येक लग्न समारंभ असो वा वाढदिवस असो गणेश मंडळाचे देखावे असा आगळे वेगळे देखावे आपल्या फर्मच्या माध्यमातून सादर करून ते जनतेचे लक्ष वेधून घेत असतात. आज २१ डिसेंबर रोजी जीवन बाहेती यांची मुलगी निधी हिचा विवाह सोहळा गिरीराज तापडीया यांच्याशी हॉटेल स्वरांजलीच्या पाठीमागील विस्तारीत मैदानावर आयोजित केला होता.

या विवाह सोहळ्यात आकर्षक सजावटीसह खामगाव जालना हा स्वातंत्र्य प्राप्तीपासून प्रतिक्षेत असलेल्या रेल्वे मार्गाचा आकर्षक देखावा सादर केला होता. हा रेल्वे मार्ग स्वातंत्र्यप्राप्तीपासून प्रतिक्षेत आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत विविध आंदोलनाने हा रेल्वे मार्ग चर्चेत गेला होता. शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ, खासदार प्रतापराव जाधव यांनी सातत्याने या रेल्वे मार्गाचा प्रश्न संसदेत उचलून धरला. परंतु अपेक्षित यश त्यांना प्राप्त झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खामगाव येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी हा रेल्वे मार्ग करण्याचे आश्वासन दिले. या रेल्वेमार्गाला मान्यता प्रदान केली. परंतु अजूनही निधीच्या तरतुदी अभावी हा रेल्वे मार्ग अपेक्षित व उपेक्षित आहे. नेमके हेच हेरून जीवन बाहेती यांनी आपल्या मुलीच्या लग्नात हा देखावा सादर करून चिखली रेल्वेस्थानक दाखवून त्यावर वर्‍हाडी मंडळीची जेवणाची व्यवस्था केली होती.

हा देखावा संपूर्ण लग्नाचे आकर्षण होते. या लग्न समारंभासाठी आलेली वर्‍हाडी मंडळी सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी हा देखावा नेहाळत होते. या लग्न समारंभासाठी आलेले चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे हे लग्न समारंभात उपस्थित राहून देखावा पाहताना ‘जोपर्यंत बुलढाण्याचा खासदार रेल्वेमंत्री होत नाही तोपर्यंत तरी हा रेल्वेमार्ग होत नाही’ असा खोचक टोला या लग्नसमारंभाच्या वेळी ‘सामना’शी बोलताना मारला. संपूर्ण लग्नसमारंभात व चिखली परिसरात या खामगाव जालना रेल्वेमार्गाच्या देखाव्याची चर्चा होत अनेकांनी या देखाव्याचे फोटो व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकवर टाकून कंमेट देखील केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या