
>> रश्मी वारंग
गणपती आणि गौरी म्हणजे महाराष्ट्राचे चैतन्य पर्व. हा महोत्सव घराघरांत साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळय़ा आहेत. या पूजेत नैवेद्याचे स्थान खास.
‘निवेदं अर्हतीति’ म्हणजे नैवेद्य. देवाला निवेदन करण्यास म्हणजे अर्पण करण्यास योग्य असे पदार्थ म्हणजे नैवेद्य. पूजेच्या षोडशोपचार विधींपैकी नैवेद्य हा एक आहे. नैवेद्यासाठी तयार केलेले पदार्थ षड्रसांनी युक्त असावेत. भक्ष्य, भोज्य, लेह्य, पेय व चोष्य असे पाच प्रकारचे पदार्थ नैवेद्यात असावेत, असे ‘तंत्रसारादी’ ग्रंथात म्हटले आहे.
नैवेद्याचे तीन प्रकार मानले आहेत. पहिला लघू नैवेद्य, ज्यात दूध, साखर, पेढे, गूळ, गूळखोबरे यांचा समावेश होतो. त्यानंतर असतो प्रसाद नैवेद्य. अर्थात विशिष्ट हेतूने व्रत किंवा पूजा करताना दाखवला जाणारा नैवेद्य. जसे की, सत्यनारायण पूजेला संजीवक म्हणजे शिरा, सोळा सोमवार व्रताला चूर्म्क म्हणजे चुरमा, लक्ष्मीपूजनावेळी लाह्या-बत्तासे आपण नैवेद्य म्हणून दाखवतो आणि तिसरा असतो महानैवेद्य, जो गणपती, नवरात्र या काळात विविध प्रकारे दाखवला जातो. यात भक्ष्य म्हणजे पोळी-भाकरीसारखे पदार्थ असावेत. भोज्य म्हणजे भात, खिचडी असे पदार्थ. लेह्य म्हणजे पंचामृत, चटणीसारखे चाटून खाता येणारे पदार्थ. चोष्य म्हणजे चोखून खाता येणारे आंबा, शेवग्याच्या शेंगासारखे पदार्थ. पेय म्हणजे पिता येणारे बासुंदी, खिरीसारखे पदार्थ असावेत, अशी महानैवेद्याची संकल्पना आहे.
नैवेद्य नेहमी देवतेच्या उजव्या हाताला ठेवावा, असे सांगितले आहे.
महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीत पेशवाई थाटाचा उल्लेख वारंवार होत असला तरी छत्रपती शिवरायांच्या काळातही नैवेद्य संकल्पना अतिशय सुबकपणे पाळली जायची. समर्थ रामदासांनी प्रभू रामचंद्राला दाखवण्याच्या नैवेद्याचे तीन भाग सांगितले आहेत. पानाची डावी बाजू म्हणजे लवणशाखा. सगळय़ा चटण्या, तळलेले पदार्थ, लिंबू इत्यादी पदार्थ या शाखेत वाढले जात. मधला प्रमुख अन्न भाग. अन्न भागात कणकेची सोजी, रव्याचा शिरा, पुरण, सांजापोळी, तेलपोळी, साधीपोळी, रांजणावर भाजलेले मांडे, तुपात तळलेल्या पुऱया, कानवले, करंजी, भाकरी, रोटले, धिरडी, पानवल्या, पानग्या, खांडवी, गूळवडय़ा, सांजावडय़ा, डाळीचे ढोकळे, वेगवेगळे लाडू, साधा भात, साखरभात, गूळनारळीभात, मसाला भात, तूप व मध मिसळून केलेला राबभात, मध, तूप व दुधाच्या वेगवेगळय़ा वाटय़ा, निरनिराळय़ा खिरी, शिकरणी, लोणी, घट्ट दही असावे असा संकेत होता आणि पानाची उजवी शाक शाखा म्हणजे भाज्या.
आजच्या दिवशी महाराष्ट्रातील अनेक भागांत गौरीला मांसाहारी अर्थात तिखटाचे जेवण दिले जाते. त्यामागचे कारण सांगणारी पौराणिक कथा सांगते की, गौराईचे शंकराबरोबर लग्न झाल्यानंतर ती माहेरी जायला निघाली तेव्हा शंकरांनी सोबतीला आपले भूतगण दिले. गौराई जेव्हा माहेरी आली तेव्हा तिच्या आईला खूप आनंद झाला. गौराईचा पाहुणचार करण्यासाठी गोडधोड पदार्थ बनवले. गौराईबरोबर आलेल्या भूतगणांना घरचे विसरले. गौराई मात्र त्यांना विसरली नाही. गौराईने या भूतगणांना वर्ज्य नसलेला मांसाहार त्यांना खायला घातला. तळागाळांतील आपल्या माणसांसाठी तिची कळकळ या प्रसंगातून जाणवते. त्यामुळे जेव्हा गौरी घरी येतात तेव्हा तिच्या बरोबर भूतगण आहेत असे गृहीत धरून त्यांच्यासाठी मांसाहार केला जातो. कारण ते खूश झाले तर शंकर व गौरी आपल्यावर प्रसन्न होतील अशी भावना असते, पण कथेपेक्षाही ज्या ज्या प्रांतात जे जे पिकते, जे जे आवडीने खाल्ले जाते त्याचा नैवेद्यात समावेश होत गेला असावा हे कारण अधिक पटते.
नैवेद्यात तुम्ही काय काय देता यापेक्षा कोणत्या भावनेने देता हे जास्त महत्त्वाचे. त्यामुळे साधी साखर किंवा गूळखोबरेही ठेवले तरी चालेल, पण ते मनापासून ठेवा आणि भक्तिभावाने फक्त म्हणा, नैवेद्यम् समर्पयामि।