चिखलातून सावरताहेत उद्ध्वस्त संसार!

खेड, चिपळुणातील महापुराचे पाणी ओसरतेय. घरांमध्ये शिरलेले पाणी उतरल्यानंतर आता फक्त चिखल उरला आहे. अभूतपूर्व महाप्रलयाने अनेकांच्या संसाराचाच चिखल केला. आता पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार. पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने फूटभर मातीचा थर खेड, चिपळूणच्या घराघरात साचला आहे. तो उपसण्याचे काम नागरिक करत आहेत. डोळय़ात पाणी आणि हातात फावडे घेऊन या चिखलातून आपले उद्ध्वस्त संसार सावरण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

आज सकाळी दहापर्यंत सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. त्यानंतर पावसाचा वेग थोडा कमी झाल्यानंतर पाण्याची पातळीही खाली घसरू लागली.

दुपारपर्यंत बहुतांश घरे आणि दुकानांमधील पाणी ओसरले. पण त्या पाण्याबरोबर आलेला चिखल आणि कचरा तिथेच होता. घरात प्यायला पाणी नाही मग चिखल धुऊन कसा काढणार? भांडय़ापुंडय़ांसह अनेकांच्या घरातला झाडूही वाहून गेला होता. अखेर पुठ्ठे, पत्रे, टोपल्या असे जे मिळेल ते हाती घेऊन घरातील चिखल साफ करण्याची पाळी खेडकर आणि चिपळूणकरांवर आली. जे काही शिल्लक राहिले ते जमा करणे आणि पुन्हा उभे राहणे असाच विचार करत घरातील विस्कळीत वस्तू पूर्ववत करण्याची त्यांची धडपड सुरू आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या