खेड : गेल्या दोन दिवसात घरडा कंपनीतील तब्बल 38 कामगारांना कोरोना

778

खेड तालुक्यात कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ पाहत असलेल्या लोटे परिसरातील घरडा कंपनीत गेल्या दोन दिवसात तब्बल 38 कामगारांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याने खळबळ उडाली आहे. कंपनीने खासगी लॅबमध्ये कामगारांच्या स्वॅबची तपासणी केल्यानंतर ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. घरडा कंपनीतील हजारो कामगार काम करत असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे २७ जून रोजी उघड झाले होते. त्यानंतर हा आकडा वाढतच चालला आहे. तिथपासून आजपर्यत या कंपनीतील ६० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ज्या कामगारांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यांच्या कुटुंबियांचाही अहवाल पॉझिटिव्ह येऊ लागला असल्याने घरडा कंपनीच्या पॉझिटिव्ह कामगारांची संख्या वाढतच चालली आहे.

कोरोना विषाणु हा संसर्गजन्य असल्याने कंपनीत पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने तात्काळ कंपनी शट-डाऊन करणे गरजेचे होते संपुर्ण कंपणीचे निर्जतुंकीकरण करून नंतरच कंपनी सुरु करायला हवी होती. तालुका आणि जिल्हा प्रशासनानेही यामध्ये लक्ष घालायला हवे होते. मात्र प्रशासनासह कंपनी व्यवस्थापनानेही याकडे दुर्लक्ष केल्याने घरडा कंपनी आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.

कंपनीतील अनेक कामगारांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येऊ लागल्यानंतर काल कंपनी व्यवस्थापनाने खासगी लॅब द्वारे कामगारांची तपासणी केली. यानुसार काल आलेल्या अहवालानुसार २१ कामगार पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. काही अहवाल यायचे बाकी होते. ते अहवाल आज आले असता कंपनीतील आणखी १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. कंपनीत सुमारे साडेतीन हजार कामगार काम करत आहेत. हे सर्वच कामगार नियमित कामावर येणारे आहेत. त्यामुळे घरडा कंपनीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कितीतरी पटीने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक कामगार या कंपनीतील ठेकेदारांकडे काम करत आहेत. ड्युटी संपली की हे कामगार आपापल्या गावी जातात. यातील काही कामगार पॉझिटिव्ह आल्याने ते रहात असलेल्या गावांमध्येही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. काही कामगारांचे आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलंही पॉझिटिव्ह आढळू लागल्याने घरडा कंपनीत पेटलेल्या हा वणवा अवघ्या तालुकाभर पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या