खेड येथील कावळे-धनगरवाडी गावात पाणीटंचाई, नादुरुस्त रस्त्यांमुळे गावकरी हैराण

खेड तालुक्यातील कावळे-धनगरवाडी या गावातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येने ग्रासले आहे. नादुरुस्त रस्त्यांमुळे कावळे गावात जाण्यासाठी सहा किमी. पायपीट करावी लागते. घनदाट जंगल आणि डोंगरदऱ्या तुडवत लोकं गाव गाठतात. गावातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर डोली करून डॉक्टरांकडे न्यावे लागते.

खेड तालुक्यापासून 30 किमी अंतरावर ही कावळे धनगरवाडी गाव आहे. स्वातंत्र्याची 75 वर्षे होऊनही गावात अजून पक्का रस्ता तयार झालेला नाही. जंगल आणि डोंगरदऱ्यातून वाट काढत गावात जावे लागते. रस्ता समस्येसोबतच गावात पाणीटंचाईचीही बोंब आहे. गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. रस्ते आणि पाणी या मूलभूत गरजा उपलब्ध नसल्याने गाव विकासापासून दूर आहे.

गावात रस्ता नसल्याने आजरी व्यक्तीला किंवा गरोदर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी डोली करून न्यावे लागते. रस्ते दुरुस्ती, पाणीटंचाई या समस्यांमुळे ग्रामस्थ संघर्षमय जीवन जगत आहेत. या समस्यांमुळेच गावातील लोकांना बेरोजगारीच्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक तरुणांना गाव सोडून रोजगाराकरिता गावाबाहेर जावे लागले. शाळकरी मुलांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शाळेत जाण्यासाठी त्यांना एक तास पायपीट करावी लागते. शाळेत जाण्यासाठी दूरवर पायी चालत जावे लागत असल्याने मुले चालून चालून थकून जातात. त्यामुळे अभ्यासाला वेळ मिळत नाही. वयोवृद्ध ग्रामस्थांचे प्रचंड हाल होतात. कावळे धनगरवाडीत रस्ता आणि पाण्याची सोय व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.