अवैध लाकुड वाहून नेणारा ट्रक खेड पोलिसांच्या ताब्यात

मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे खेड पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत लाखो रुपये किमतीचा अवैध लाकुड साठा जप्त करण्यात आला आहे. एका मालवाहू ट्रकमधून जप्त करण्यात आलेला हा लाकुड खैर जातीचा असावा अशी शक्यता असून याची बाजारातील किंमत लाखो रुपयांची असल्याचे बोलले जात आहे.

उपलब्ध माहितीनुसार रविवारी पहाटे मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका परिसरात पोलिसांची गस्त सुरु असताना एमएच- 08 – एच – 1648 क्रमांकाचा मालवाहू ट्रक पोलिसांनी चौकशीसाठी अडवला. ट्रकच्या मागील बाजूस तपासणी केली असता मागच्या बाजुला मोठ्या प्रमाणात सोललेला लाकुडसाठा आढळून आला.

संबंधित ट्रक चालकाकडे अशा प्रकारचा सोललेला लाकुड साठा वाहून नेण्याचा परवाना नसल्याने पोलिसांनी लाकुड भरलेला तो ट्रक जप्त करून पोलीस स्थानकात आणला. कात तयार करण्यासाठी लागणारा खैराचा लाकूड हा कात कारखान्यावर विकण्यापुर्वी त्याची साल पुर्णपणे काढण्यात येते. पोलिसांनी पकडलेल्या लाकूडसाठ्यातील लाकडांची साल पुर्णपणे काढलेली असल्याने हा लाकूड खैर जातीचा असावा असा अंदाज आहे.

ज्या ट्रकमधून हा अवैध लाकुडसाठा वाहून नेला जात होता तो एमएच 08 एच- 1648 हा मालवाहू ट्रक विनोद सिताराम काते यांच्या नावाने असल्याची माहिती आरटीओ रत्नागिरी यांच्याकडून उपलब्ध झाली आहे. मात्र तो लाकुडसाठा कुठून आणला आणि कुठे वाहून नेला जात होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वनविभाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता ही कारवाई पोलिसांनी केलेली असल्याने आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही’ असे दापोलीचे रेंजर बोराटे यांनी सांगितले. या कारवाईबाबत खेड पोलिसांशी संपर्क साधला असता या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या