कोकणात मुसळधार पाऊस, खेड शहरात सतर्कतेचा इशारा

49

सामना ऑनलाईन । खेड

रविवार मध्यरात्रीपासून खेड तालुक्यात धो धो पाऊस कोसळत असल्याने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत क्षणाक्षणाला वाढ होत असल्याने शहरातील व्यावसायिकांना सतर्क राहण्याच्या इशारा देण्यात आला आहे. काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे खेड-दहिवली मार्गावर तळेनजीक दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दहिवली परिसरात काल रात्री वस्तीसाठी गेलेल्या एसटीच्या बसेस तिथेच अडकून पडल्या आहेत. धुवाँधार पावसाचा एसटीच्या वेळापत्रकावरही मोठा परिणाम झाला आहे.

मुसळधार पावसाने जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. या दोन्ही नद्यांच्या धोक्याची पातळी ही ७ मीटर इतकी आहे. आज सकाळी या दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्याने खेड नगरपालिकेने सायरन वाजवून व्यापार्यांना सतर्कतेचे इशारा दिला. नारंगी नदीचे पाणी आजुबाजुच्या शेतात घुसल्याने खेड-दापोली मार्गालगतचा संपूर्ण परिसर जलमय झाला. खेड-बहिरवली मार्गावरील सुसेरी गावाजनीकच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली.

रघुवीर घाट व आंबवली परिसरात मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. जगबुडीचे वाढलेले पाणी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मच्छिमार्केटपासून शहराकडे उसळी मारू लागल्याने व्यापाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली. खेड नगरपालिका प्रशासनानेही शहरातील नागरिकांना सतर्क करण्यासाठी सायरन वाजवून धोक्याची सूचना दिली.

खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पावसाचा जोर वाढला तर जगबुडी व नारंगी या दोन्ही नद्यांचे पाणी शहरात घुसण्याची शक्यता आहे. त्यातच येत्या २४ तास अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला असल्याने शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. शहरातील पूर प्रवरण क्षेत्रामध्ये पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक ती यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. नगरपालिका कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्षाचीही स्थापना करण्यात आली असून नागरिकांना आवश्यकता वाटल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जगबुडी नदी पुलाच्या वरच्या बाजूला असलेल्या बंधाऱ्याचे सुरू असलेले काम सहा फूटांपर्यत झाले आहे. त्यामुळे जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढताच अर्धवट स्थितीत असलेला हा बंधारा पाण्याखाली गेला आहे. जगबुडीच्या पुरामुळे जुन्या ब्रिटीशकालीन पुलाला धोका पोहचण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना संबधितांना करण्यात आल्या आहेत. खेड तहसिलदार कार्यालयातर्फे खेडमध्ये आतापर्यंत १२३४ मि.मी पावसाची नोंद झाली झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या