कॅटामाईन चोरीप्रकरणी एफडीएची धडक कारवाई, सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीचे उत्पादन बंद

51

सामना प्रतिनिधी, खेड

सुमारे दहा कोटी रुपये किमतीच्या कॅटामाईनचा थेट संबंध असलेला लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स हा कारखाना प्रथमदर्शनी दोषी आढळून आल्याने फुड ऍण्ड ड्रग विभागाने या कारखाना व्यवस्थापनाला उत्पादन बंद करण्याची नोटीस बजावली आहे. एफ डी ए च्या आदेशानुसार सद्यस्थितीत कारखान्याचे उत्पादन बंद ठेवण्यात आले आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स या कारखान्यात तयार करण्यात येणाऱया कॅटामाईन या अमली पदार्थाचे मोठय़ा प्रमाणात चोरी झाल्याचे उघड झाले होते. काही महिन्यांपूर्वी या कारखान्यात ठेकेदार पद्धतीने काम करणाऱया मंगेश कदम याने जेवणाचा डबा आणि सॅकमध्ये लपवून १० किलो कॅटामाईन बाहेर काढले होते.

करोडो रुपयांचे कॅटामाईन चोरल्यावर मंगेश याने या कारखान्यातील नोकरीला रामराम केला होता. काही दिवस आपल्या घराच्या पोटमाळ्यावर लपवून ठेवलेले कॅटामाईन त्याने चिपळूण येथील मित्र संतोष कदम व स्वप्नील कोचरे यांच्या मार्फत विकण्याचा प्रयत्न केला. ठरल्याप्रमाणे संतोष कदम हा मंगेश कदम याच्याकडील दहा किलो कॅटामाईनपैकी ५ किलो कॅटामाईन चिपळूण येथे विकण्यासाठी घेऊन गेला. चिपळूण शहरातील विश्वेश्वर तलाव परिसरात कॅटामाईन विकत घेणारी पार्टी येणार होती; परंतु तत्पूर्वी चिपळूण पोलिसांना याची खबर लागली आणि पोलिसांनी संतोष कदम यांना ५ किलो कॅटामाईनसह ताब्यात घेतले.

संतोष यांची कसून चौकशी केल्यावर या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मंगेश कदम व स्वप्नील कोचरे या दोघांची नावे पुढे आली. चिपळूण पोलिसांनी मंगेश याला ताब्यात घेतल्यावर त्याच्या घराच्या माळ्यावरून आणखी ५ किलोंचे कॅटामाईन जप्त केले. चौकशी दरम्यान हे कॅटामाईन आपण सुप्रिया लाईफ सायन्स या कारखान्यातून चोरल्याची मंगेशने कबुली दिली.

या प्रकरणाची चौकशी करणारे चिपळूणचे पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सलग तीन दिवस कारखाना व्यवस्थापन व सुरक्षा यंत्रणेची कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान कॅटामाईनचे उत्पादन करताना कंपनी व्यवस्थापनाने आवश्यक ती खबरदारी न घेतल्याचे आढळून आल्याने कंपनीला उत्पादनासाठी परवानग्या देणाऱ्या फुड ऍण्ड ड्रग्ज विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून कारखान्याला उत्पादन बंद करण्याची नोटीस द्यावी अशी शिफारस केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या