खेतीया-चिकोडी महामार्ग मृत्यूचा सापळा

30

सामना प्रतिनिधी, सटाणा

सटाणा शहरातून जाणाऱ्या खेतीया-चिकोडी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून हा मार्ग आता मृत्यूचा सापळा बनला आहे. ७ ऑगस्ट रोजी एका रिक्षाला भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने रिक्षातून प्रवास करणारा तरुण गंभीर जखमी झाला असून तो अत्यवस्थ आहे. निष्काळजीपणे वाहन चालवणाऱया चालकावर कारवाई करावी तसेच शहराबाहेरून पर्यायी मार्ग (बायपास) काढावा या मागणीसाठी आज सटाणावासीय एकवटले. यावेळी नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आपले निवेदन सादर केले.

सटाणा शहरातून जाणारा खेतीया -चिकोडी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५५ मध्यप्रदेश मधील खेतीया पासून सुरु होऊन कर्नाटक मधील चिकोडी मध्ये संपतो. या महामार्गावरच दुतर्फा शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा माध्यमिक विद्यालये, बँका, तसेच व्यापारी दुकाने आहेत. यामुळे नागरिकांची येथे नेहमीच गर्दी असते. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय महामार्गावर मोठय़ा प्रमाणात होणारी अवैध वाहतूक ऍपेरिक्षा, तसेच खासगी वाहनधारकांना अडचणीची ठरत आहे. अवजड व प्रचंड वाहतूक या मार्गावरून होत असल्याने या ठिकाणी सातत्याने लहान मोठ्या स्वरूपाचे अपघात घडत आहेत.

७ ऑगस्ट रोजी सटाणा शहरातील अहिल्याबाई चौक येथील गोरख जाधव हा तरुण सटाणा बस स्थानकाजवळून दोधेश्वर नाक्याकडे रिक्षाने जात असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याचा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून तो अत्यवस्थ आहे. असे असतानाही आजपर्यंत वाहनचालक व वाहनाधारकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. सदर वाहन व वाहनचालकास अनेक प्रत्यक्षदर्शींनी बघितले असून अपघातास जबाबदार असलेल्या सबंधित वाहनचालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.

वाहन चालकावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी दीपक पाकळे, जयवंत वाघ, रोहित जाधव, नामदेव जाधव, दामोधर नंदाळे, जव्हार जाधव, संजय पाकवार, दिलीप बगडाणे, समाधान सोनपवणे, संजय लांडे, शिवाजी सोनवणे, नंदकिशोर सोनवणे, केतन नंदाळे, नीलेश बगडाणे, स्वप्नील नंदाळे, विकास मोरे आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या