खो-खो कार्यशाळा दणक्यात संपन्न

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे आधारस्तंभ शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ऑनलाइन कार्यशाळेच्या सहाव्या सत्रात खो-खो खेळात खेळाडूंनी दुखापतीच्या तीव्रतेनुसार विश्रांतीचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. कश्मिरा सबनीस यांनी केले. दुखापतीच्या तीव्रतेनुसार खो-खो खेळाडूने विश्रांतीचे नियोजन केले पाहीजे. तसेच त्वरित वैद्यकीय अधिकाऱयांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत, जेणेकरून दुखापतीमधून सावरुन खेळाडू पुन्हा मैदानावर त्याच जोमाने खेळण्यास उतरू शकेल, असे फिजिओथेरपिस्ट डॉ. कश्मिरा सबनीस यांनी सांगितले. या कार्यशाळेच्या समारोपाच्या सत्रात खो-खोत होणाऱया दुखापती आणि त्यावरील उपचार पद्धती यावर त्यांनी प्रात्यक्षिकासह माहिती दिली. खो-खो कार्यशाळेला चांगला प्रतिसाद लाभला.

डॉ. कश्मिरा सबनीस पुढे म्हणाल्या की, दुखापत टाळण्यासाठी नियोजनबद्ध सराव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सराव झाल्यानंतर पुलडाऊनचे व्यायामप्रकार केले पाहिजेत. त्यामधूनही दुखापत झाल्यास आरंभी त्याची तीव्रता तपासली पाहीजे. त्यानुसार विश्रांतीचे नियोजन करावे. तीव्रता अधिक असेल तर वैद्यकीय तपासण्या करून घ्याव्यात. 7 ते 11 वयातील मुलांकडून जास्त सराव करून घेऊ नये, मात्र याच वयात त्यांना मैदानावर आणल्यास त्यांच्यात जोमाने प्रगती होऊ शकेल असेही सांगितले. राज्य खो-खो संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे निबाळकर, सचिव गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. अरुण देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वी झाली. राजेंद्र साप्ते यांच्यासह प्रा. शिरीष मोरे, समीर चुनेकर, आकाश सावले यांनी ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या