खो-खो स्पर्धा – किशोर-किशोरी गटांत सांगलीला, तर पुरुष-महिला गटांत पुण्याला दुहेरी जेतेपद

भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत किशोर-किशोरी गटातील सामन्यांचा थरार सांगलीकर क्रीडाप्रेमींनी अनुभवला. त्यामध्ये यजमान सांगलीच्या संघांनी दुहेरी विजेतेपदाला गवसणी घातली. किशोरी गटात धाराशीव तर किशोर गटात ठाणे उपविजयी ठरले. पुरुष व महिला गटात पुण्याने दुहेरी विजेतेपद पटकावले तर महिलांमध्ये धाराशीव आणि पुरुषांमध्ये मुंबई उपनगरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

अंतिम सामन्यांचा थरार पाहण्यासाठी हजारो सांगलीकर उपस्थित होते. त्यांची अपेक्षाही किशोर-किशोरी गटातील खेळाडूंनी पूर्ण केली. किशोरींच्या अंतिम सामन्यात यजमान सांगलीने धाराशीवचा (25-22) 3 गुणांनी पराभव करत स्पर्धेतील विजेतेपद पटकावले. आरंभीला दोन्ही संघांचे गुण (15-15) समान झाल्यामुळे जादा डाव खेळवण्यात आला. या डावातील आक्रमणात सांगलीने 10 गुण मिळवले. धाराशीवला आक्रमणात 7 गुणच मिळवता आले. त्यामुळे या सामन्यात सांगली संघ विजयी ठरला.

किशोर गटात सांगलीने ठाण्याचा लघुत्तम आक्रमणापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात पराभव करत पै. भाई नेरूरकर राज्यस्तरीय स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. जादा डावात समान गुण झाल्यामुळे लघुत्तम आक्रमणाचा डाव खेळवण्यात आला. त्यामध्ये सांगलीने विजय मिळवला. चुरशीच्या सामन्यात सांगलीकडून रितेश भालदार (1.30, 1.50 व 1 मि. संरक्षण व 4 गुण), संग्राम डोबळे (2, 1, 3 मि. संरक्षण), श्री दळवी (1, 2.20 व 1.30 संरक्षण व 3 गुण) असा खेळ केला.

महिला गटात पुण्याने धाराशीवला (11-10) 4.10 मिनिटे राखून 1 गुणाने मात केली. पुण्याकडून प्रियांका इंगळे (2.40, 2.10 मि. संरक्षण व 4 गुण), कोमल धारवाडकर (2, 1 मि. संरक्षण), काजल भोर (1.30 व नाबाद 1 मि. संरक्षण व 4 गुण) यांनी पुण्याच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. धाराशीवकडून सुहानी धोत्रे (4 गुण), अश्विनी शिंदे (2, 3 मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला.

पुरुष गटात अंतिम सामन्यात पुण्याने मुंबई उपनगरवर (20-10) 10 गुणांनी सहज मात केली. या विजयात पुण्याकडून खेळताना आदित्य गणपुले (2.30, 1.10 मि. संरक्षण व 5 गुण), शुभम थोरात (2.40 मि. संरक्षण), सुयश गरगटे (2, 1 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी मोलाची कामगिरी केली. मुंबई उपनगरकडून अनिकेत चेंदणकर (1.50, 1, 1.40 मि. संरक्षण व 1 गुण), ऋषिकेश मुरचावडे (1.30, 1.40 मि. संरक्षण व 1 गुण) यांनी चांगला खेळ केला.