महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची फायनलमध्ये धाक: पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद (फेडरेशन चषक) स्पर्धा

37
संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्राच्या पुरुषांची कोल्हापूरशी तर महिलांची कर्नाटक विरुद्ध अंतिम ‘दंगल’...

धाराशीव – तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशीव येथे हिंदुस्थानी खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानतर्फे आयोजित पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद (फेडरेशन चषक) स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी दिमाखात अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राच्या पुरुषांचा अंतिम सामना कोल्हापूरबरोबर तर महिलांचे द्वंद्व कर्नाटकशी रंगेल.

महिलांच्या कर्नाटक विरुद्ध केरळ या तुल्यबळ संघांतील रोमांचक उपांत्य सामन्यात अलाहिदा डावातील वीणा.एमच्या जिगरबाज पाच मिनिटांच्या खेळीच्या जोरावर कर्नाटकने केरळचे कडवे आव्हान मोडून काढले व अंतिम फेरी गाठली. केरळने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले होते. मध्यंतराला एका गुणाची पिछाडी फिरवून केरळने दुसऱया डावात बरोबरी साधली. ही कोंडी फोडण्यासाठी खेळवल्या गेलेल्या अलाहिदा डावात कर्नाटकची एका गुणाने सरशी झाली व कर्नाटकने सामना (५-४, ३-४, ४-३) १२-११ असा जिंकला. कर्नाटकच्या वीणाने पहिल्या डावात २ मिनिटे , दुसऱया डावात ४ मिनीटे व अलाहिदा डावात ९ पैकी तब्बल ५ मिनिटे संरक्षण करून सामना खेचून आणला. वीणाबरोबरच कर्नाटकच्या मेघा के.एस.ने देखील अष्टपैलू खेळ करीत (२.४० मि, २.३० मि, १.४० मि व ४ गडी) खो-खो रसिकांची वाहवा मिळवली तर सिंधू.पी ने संरक्षणात १.३० मि व १.५० मिनीटे वेळ नोंदवून आक्रमणात २ गडी टिपले. केरळच्या वर्षा एस. (२.२० मि, २.४० मि, २.१० मि व २ गडी) व आर्याचे (२.५० मि व २ मि) प्रयत्न तोकडे पडले.

महिलांच्या दुसऱया उपांत्य सामन्यात गतविजेत्या महाराष्ट्राने दिल्ली संघाचा (१०.३,०.३) १०-१६ असा १ डाव व ४ गुणांनी पराभव केला. महाराष्ट्राने नाणेफेकीचा कौल जिंकून आक्रमण स्वीकारले व प्रतिस्पर्धी संघाचे १० गडी बाद करून पहिल्या डावातच सामन्यावर प्रभुत्व मिळवले. सारिका काळेने आक्रमणात ३ गडी टिपले. तद्नंतर महाराष्ट्राच्या प्रियांका भोपी व श्रुती सकपाळने प्रत्येकी ३.२० मिनिटे तर कर्णधार आरती कांबळे व ऐश्वर्या सावंतने प्रत्येकी ३ मिनिटे दिल्लीकरांना अक्षरशः रांगवले.

पुरुषांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकवर (९-३,०-३) ९-६ अशी ३ गुणांनी डावात मात केली. महेश शिंदेने २.५० मि व ३ मिनिटांच्या कर्णधारपदाला साजेशा खेळी केल्या. त्याला दीपेश मोरे (२.३० मि), अक्षय गणपुले (१.३० मि. व ३ मि) व मिलिंद चावरेकरने (३ गडी) उत्तम साथ दिली.

विजय हजारे (२ मि, १.३० मि व ४ गडी), सागर पोतदार (२.४० मि व १.५० मि) व उमेश सातपुते (२.२० मि व १.३० मि ) यांच्या चतुरस्र खेळाच्या जोरावर कोल्हापूरने तेलंगणा संघाचा (१, ०-६) १०-९ असा १ डाव व १ गुणांने सहज पराभव केला व अंतिम फेरी गाठली.

प्रेक्षकांचा खो-खोला उदंड प्रतिसाद ः धाराशीवमधे आयोजित या स्पर्धेला स्थानिक खो-खो रसिक दर्दी प्रेक्षकांनी ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद दिला असून चार हजार आसन क्षमता असलेली प्रबोधनकार ठाकरे क्रीडानगरीतील गॅलेरी कडाक्याच्या थंडीतदेखील तुडुंब भरत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या