मालवणी खोपडी कांडातील वॉण्टेड म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या

68

सामना ऑनलाईन । ठाणे

मालाड येथील मालवणी परिसरात २०१५ मध्ये झालेल्या खोपडी कांडात १०६ जणांचे बळी घेणाऱ्या वॉण्टेड म्होरक्याला ठाणे पोलिसांनी मध्य प्रदेशातून उचलले आहे. धर्मेंद्र सिंग शिवबली सिंग तोमर ऊर्फ संजय सिंग असे या आरोपीचे नाव आहे. खोपडी बनवण्यासाठी लागणाऱ्या केमिकलचा पुरवठा त्याने केला होता. संजय सिंग याला २५ मेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

२०१५मध्ये मालवणीत भयंकर खोपडी कांड घडले. हातभट्टीची दारू प्यायल्यानंतर मालवणीत एकापाठोपाठ एक लोकांचे मृत्यू झाले आणि दोन दिवसांत हा आकडा १०६ वर पोहोचला. या खोपडी कांडाने मुंबईसह अवघा महाराष्ट्र हादरला होता. पोलिसांनी या प्रकरणात काही आरोपींना अटक केली होती. मात्र हातभट्ट्यांना केमिकल पुरवणारा आरोपी धर्मेंद्र सिंग ऊर्फ संजय सिंग हा फरार होता.

ठाणे पोलिसांची हातभट्ट्यांविरोधात धडक कारवाई सुरू आहे. शिळ डायघर येथे हातभट्ट्यांवर धाड घातल्यानंतर त्यांना केमिकलचा पुरवठा संजय सिंग नावाच्या इसमाकडून इंदोर येथून होतो असे क्राईम ब्रँच युनिट १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना कळताच त्यांनी पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सिंग याची कुंडली तयार केली आणि मध्य प्रदेशातील राजेंद्रनगर येथे छापा घालून त्याच्या मुसक्या आवळल्या. यावेळी चौकशीत संजय सिंग याने मालवणी येथील खोपडी अड्डय़ांसाठी मीच घातक केमिकल पुरवले होते याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक रणबीर बयस, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल, चिवड शेट्टी, हवालदार आनंद भिलारे, पोलीस नाईक संभाजी मोरे, विक्रांत कांबळे, कॉन्स्टेबल राहुल पवार या पथकाने ही धडक कारवाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या