खुलता कळी खुलेना

55

<< टिवल्याबावल्या >>    << शिरीष कणेकर  >>

एखाद्या आसन्नप्रसव महिलेचा रक्तदाब एकाएकी वाढला तर? तर काय, तिला दाबून रक्त द्यायचं.

हे अपूर्व वैद्यकीय ज्ञान मला नुकतंच ‘खुलता कळी खुलेना’ ही रात्री साडेआठ वाजता ‘झी’ टीव्हीवर दिसणारी (व नेमकी आमच्या जेवणात माती कालवणारी) कौटुंबिक, जिव्हाळ्याची मालिका बघताना झाले. माझा रक्तदाब वाढला. मालिकेतल्या कोणाचं तरी (शक्यतो ‘गायनॅकॉलॉजिस्ट’ निर्मलाचं) रक्त दिल्यास तो खाली उतरेल असे मला वाटले. (आम्ही उगीच गाढवासारखे ‘कार्डेस’ किंवा ‘स्टॅम्लो’ गोळ्या घेत होतो.) ‘तुम मुझे ब्लडप्रेशर दो, मैं तुम्हें खून दुंगी’ असा नेताजीटाइप वीरश्रीपूर्ण संवाद निर्मलाच्या तोंडी टाकायला हरकत नव्हती. मुळात पेशंटला न बघताच तिचा रक्तदाब वाढलाय हे निदान करणारी व रक्तपुरवठा हा त्यावरील इलाज असल्याचं बसल्याजागी ताडणारी निर्मला थोर डॉक्टरीणच म्हटली पाहिजे.

डॉ. विक्रांत म्हणजे भलताच निष्णात स्त्रीरोगतज्ञ. सप्तपदी चालताना (होऊ घातलेल्या) सहधर्मचारिणीचा हात रिवाजानुसार हातात घेतल्याक्षणी त्याला कळतं की ती गरोदर आहे. ‘बाई, तू पोटुशी गं पोटुशी’ असं काहीतरी गावं की मुकाटय़ानं सप्तपदी पूर्ण करावी अशा संभ्रमात तो दिसतो. ‘नॉर्मल डिलिव्हरी’ होऊ द्यावी की ‘सिझेरियन’ करावं इतकाच हा संभ्रमात टाकणारा प्रश्न होता. त्याला निवांतपणे आपल्या नवपरिणित उद्योगी पत्नीची नाडीपरीक्षा करण्याचीही आवश्यकता भासत नाही. नंतर त्याच्या नर्सिंगहोममध्ये तो हातात सतत ‘स्टेथॅस्कोप’ घेऊन फिरतो. जणू मोबाईल फोन. मग अग्नीभोवती सात फेरे घेताना जवळ ‘स्टेथॅस्कोप’ असता तर बायकोच्या चारित्र्याचे म्हणजेच लग्नाआधीच्या कर्तबगारीचे पडघम त्यालाच काय, लग्न लावणाऱ्या भटजींना व सर्व मांडवाला ऐकू गेले असते. बदफैलीपणाचं घोंगडं गळ्यात (व पाप पोटात) असताना सौ. विक्रांत ऊर्फ मोनिका कशाच्या बळावर उर्मटपणे बोलत, वागत असते ते मालिकेच्या लेखकांना व दिग्दर्शकाला माहीत. संशोधनातून कळले की अंबर हडप, शर्वरी पाटणकर व विवेक आपटे असे तिघे या मालिकेचे लेखक आहेत. मोनिकाच्या अपत्याच्या जन्मदात्यांची गोळाबेरीज अद्याप उघड करण्यात आलेली नाही. लेखकत्रयीनं प्रत्येकी एक बाप आणला तरी गेलाबाजार तीन बाप होतील.

मुद्यावर येता यायचं नाही व रहस्यभेद करणारं कधीही बोलायचं नाही अशा स्पष्ट सूचना विक्रांत, मानसी व निर्मला या तीन डॉक्टरांना दिलेल्या दिसतायत. ते तावातावानं खडसावून बोलायला येतात व काही न बोलताच शेपूट घालून निघून जातात. त्याशिवाय मालिका लांबणार कशी? टी.आर.पी. चांगला असेल तर न्या रेटून. प्रेक्षकांचं ब्लडप्रेशर वाढलं तर रक्त द्यायचं. स्टुडिओत रक्ताची पिंपं भरून ठेवलेली असणार. अरे, बादलीभर निर्मलाचं रक्त आणा रे, मोनिकाला पाजू या. तिचं ब्लडप्रेशर खाली आलं की तिला दाभणानं भोसकू या. म्हणजे जास्तीचं रक्त बाहेर पडेल. ती लाल शाई आहे असं नानूमामाला सांगू या, मग तो नेहमीप्रमाणे अतिसंशयानं बघेल. तो एकच भाव त्याच्या चेहऱ्यावर कायमचा ‘फेव्हिकॉल’नं चिकटवल्यासारखा वाटतो. संजय मोने कुठल्याही क्षणी कशावर किंवा कोणावर तरी तडकून मालिका सोडून निघून जाईल, असं सतत वाटत राहतं. एका ठिकाणी गुण्यागोविंदानं रमण्याला संजयाचा तात्त्विक, नैतिक, शारीरिक, बौद्धिक विरोध असतो.

डॉ. निर्मला, डॉ. विक्रांत व डॉ. मानसी कुठल्या मेडिकल कॉलेजात शिकलेत? बालरोगतज्ञ होण्यासाठी उच्च शिक्षण घेत असल्याचे सांगणारी मानसी सतत विक्रमच्या समोर बसून गालावरच्या खळ्या दाखवत कारकुनी कशी काय करते? अनुभवी निर्मला व तज्ञ विक्रांत असताना मोनिकाची केस गुंतागुंतीची होतेय अशी शंका आल्याक्षणी त्यांना कोणा डॉ. रावराणेंकडे का धावावं लागतं? डॉ. रावराणे आल्यावर हे नर्सिंगहोममध्ये वॉर्डबॉयसारखे का वावरतात? मोनिका मरणाच्या दारात असते (व ती मरणार नाही हे प्रेक्षकांनाही माहीत असतं.) तेव्हा डॉ. विक्रांत नॅपकिननं हात पुसत बाहेर नातेवाईकांशी विक्रम गोखलेच्या वर ‘पॉजेस, घेत उमाळ्याचे उसासे सोडत बोलतो. मोनिका आत ‘कोमा’तून बाहेर येऊन नर्स सारिकाबरोबर फुगडी घालत असेल असे आपल्याला वाटत राहतं. डॉ. निर्मलाला सतत खोलीतून कुठे व कशासाठी जायचं असतं? मध्येच एखादं तुटक इंग्रजी वाक्य बोललं की माणूस डॉक्टर वाटतो की काय? ही भाबडी कल्पना हडप, पाटणकर की आपटे यातल्या कोणाची?

आय.सी.यू.मध्ये किंचाळी फोडणारी डॉक्टर कोणाच्या खोपडीतून निघालेय? वास्तविक हा हिंदी चित्रपटवाल्यांचा सवतासुभा आहे. डॉक्टर व वैद्यकीय व्यवसाय यांची त्यांनी वाट लावल्येय. आय.सी.यू.मध्ये कोणीही – घरचे पाळीव प्राणीही संचार करू शकतात. यांचे डॉक्टर धोपटी घेतलेले घरी येऊन केस कापणारे वाटतात. ‘अब उन्हे दवा की नही बल्की दुवा की जरूरत है’ हे त्यांचे संपूर्णपणे जबाबदारी झटकून टाकणारे ‘डायग्नोसिस’ असते. ‘मैंने उन्हें इंजेक्शन दे दिया है, सुबह तक होश आ जायेगा’ अशी आशीर्वादपर भविष्यवाणीही ते करतात.

या डॉक्टरांनी आता मालिकातही प्रवेश केलेला दिसतोय. त्यांच्याकडे जाण्यापेक्षा सरळ डॉ. रावराणेंकडेच जावं.

पण ही खुलत नसलेली कळी कोण? मानसी, मोनिका की मोनिकाचं  रहस्य ठाऊक असलेली तिची मैत्रीण-कम-शत्रू- रिचा?

आपली प्रतिक्रिया द्या