बालकाच्या प्रसंगावधानामुळे नरबळीचा प्रयत्न फसला,मांत्रिकाला अटक

सामना ऑनलाईन,बुलडाणा

शेगांवमध्ये लहान मुलाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्याचा नरबळी देण्याचा मांत्रिकांचा प्रयत्न फसला. याप्रकरणी पोलिसांनी शंकर जगदेव शेगोकार उर्फ महाराज या मांत्रिकाला अटक केली आहे. नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि आणि अघोरी कृत्य प्रतिबंधात्मक तसेच काळी जादू अधिनियम २०१३ कलम ३ नुसार गुन्हा दाखल करून मांत्रिकासह इतर २ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

शंकर शेगोकार याने या १४ वर्षांच्या मुलाच्या अंगावर कपडा टाकला होता. त्याच्यासमोर कापूर जाळला आणि हातामध्ये उलटी कपबशी देऊन आकडे म्हणायला सांगितले,यानंतर आरोपीने मुलावर अघोरी कृत्य करायला सुरूवात केली. मात्र त्याआधीच बालकाने तिथून पळ काढला. या मुलाने घरी येऊन सगळा प्रकार वडीलांना सांगितला. यानंतर या मुलाने आणि त्याच्या वडीलांना शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली. या तक्रारीच्या आधारावर मांत्रिक आणि इतर दोन जणांना पोलिसांनी अटक केली.