महिलेचे अपहरण करून 9 तास सलग मालिका बघायला लावली

1825

एका महिलेचं अपहरण करण्यात आलं. 52 वर्षांच्या आरोपीने या महिलेला एका घरात डांबून ठेवलं होतं आणि तिला मालिका पाहायला लावली. या महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने या महिलेला धमकी दिली की जर उठलीस तर तुला ठार मारेन आणि तुझ्या शरीराचे तुकडे महामार्गावर फेकून देईन.

ही घटना अमेरिकेतील असून या आरोपीतचं नाव रॉबर्ट नोये असं आहे. रॉबर्ट हा कृष्णवर्णीय असून त्याने ज्या महिलेचं अपहरण केलं होतं ती महिला गौरवर्णीय आहे. अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीयांवर पूर्वी अनन्वित अत्याचार करण्यात आले होते. त्यांना गुलाम म्हणूनही वागवलं जात होतं. आजही अनेक युरोपियन राष्ट्रांमध्ये कृष्णवर्णीयांना त्यांच्या रंगावरून हिणवलं जातं किंवा त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. आपल्या आधीच्या पिढ्यांना काय त्रास सहन करावा लागला होता हे त्या महिलेला कळावं यासाठी रॉबर्टने तिला सलग 9 तास बसून मालिका पाहायला लावली.

रॉबर्टने जी मालिका या महिलेला पाहायला लावली तिचं नाव ‘रुटस’ असं आहे. 1976 साली अॅलेक्स हाले यांनी लिहिलेल्या याच नावाच्या पुस्तकावर ही मालिका बनवण्यात आली होती. हाले यांचं हे पुस्तक प्रचंड गाजलं होतं आणि त्यांचा पुलित्झर सन्मानाने गौरवही करण्यात आला होता. या पुस्तकामध्ये आणि मालिकेमध्ये कृष्णवर्णीयांना गुलामासारखी दिली जाणारी वागणूक त्यांची मनोवस्था आणि त्यांचा संघर्ष अशी कहाणी दाखवण्यात आली होती. या पुस्तकाची तुलना इतिहासकार रॉजर विल्कीन्स याने मार्टीन ल्युथर किंग याने 1965 साली काढलेला मोर्चा आणि त्यामुळे ढवळून निघालेले समाजकारण याच्याशी केली होती.

‘रुटस’ ही मालिका ५० देशांत दाखवण्यात आली होती. 1977 ते 1980 या कालखंडामध्ये अनेक देशातील नागरिकांनी ही मालिका पाहिली होती. या मालिकेला 9 एमि अॅवॉर्डस मिळाले होते. याशिवाय मानाचा गोल्डन ग्लोब पुरस्कारही मिळाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या