अपहरण झालेल्या दहा महिन्यांच्या बाळाला ७२ तासांत शोधून काढले

सामना ऑनलाईन । डहाणू

डहाणू येथून एका दहा महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी ७२ तासांच्या आत गुजरातमधील वलसाड येथून अटक केली आहे. पिंकू असे त्या बाळाचे नाव असून त्याला पोलिसांनी त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले आहे.

डहाणू येथील रेल्वेमध्ये काम करणारे सुलो उपेंद्र मांझी हे त्यांची पत्नी व १० महिन्याच्या बाळासोबत रेल्वेलगतच्या झोपडीत राहतात. काही दिवसांपूर्वी वलसाड येथून पुजा पटेल नावाची महिला कामाच्या शोधात डहाणू येथे आली होती. तेथे तिची ओळख सुलो यांच्या पत्नीशी झाली व पुजाने काही दिवसांसाठी त्यांच्याकडे आसरा मागितला होता. सुलो यांनी परवानगी दिल्यानंतर पूजा त्यांच्याच झोपडीत राहत होती. सुरूवातीचे दिवस सुलो व त्याची पत्नी त्यांच्या बाळाला घेऊन कामाला जायचे. पण पुजाशी चांगली ओळख झाल्यामुळे बुधवारी ते पिंकूला पूजाकडे ठेवून गेले. याचाच फायदा घेत पुजाने पिंकूचे अपहरण केले. ती पिंकूला घेऊन वाणगाव स्थानकात गेली. तेथून तिने वलसाडची एक्सप्रेस पकडली व वलसाडला तिच्या घरी गेली.

दुपारी जेव्हा मांझी दाम्पत्य जेवणासाठी त्यांच्या झोपडीत परतले तेव्हा पूजा आणि पिंकू बेपत्ता होते. त्या दोघांचीही बरिच शोधशोध केली मात्र ते दोघेही न सापडल्याने त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. सुलो व त्याच्या पत्नीला पुजाबद्दल फारसे माहित नव्हते. पण त्यांनी ती वलसाडची असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सुलो यांच्या झोपडीत शोधाशोध केली असता त्यांना तेथे पुजाचे काहीच सामान सापडले नाही. मात्र घरात एक कागद सापडला ज्यावर गुजरातीत काही फोन नंबर लिहलेले होते. त्यांनी त्या नंबरवर फोन करुन पुजाची माहिती घेतली व त्याबाबत तत्काळ वलसाड पोलिसांना कळविले. अवघ्या ७२ तासांत पोलिसांनी पुजाचा शोध लावला व पिंकूला त्याच्या आईवडीलांच्या ताब्यात दिले.

याप्रकरणी पोलिसांनी पुजा व तिचा नवरा संतोष याला अटक केली आहे. या दोघांनाही डहाणू न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. या दोघांनीही स्वत:साठी पिंकूचे अपहरण केले होते की त्याला विकणार होते याबाबत पोलिस त्यांची चौकशी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या