अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या सहाजणांवर गुन्हा दाखल, घारगाव पोलिसांकडून पाचजणांना अटक

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला 15 दिवस गावोगावी फिरवून डांबून ठेवणाऱया सहाजणांविरुद्ध घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पाच आरोपींना अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन ही कारवाई केली आहे.

अमोल बापू खेमनर, सिंधूबाई बापू खेमनर, बापू रंभा खेमनर, संदेश चिलाप्पा खेमनर, मंगेश धोंडीभाऊ शेंडगे, पोपट शेरमाळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अपहृत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला अमोल बापू खेमनर याने 15 दिवसांपूर्वी अपहरण करून पळवून नेले होते. त्यानंतर पुन्हा आणून सोडले होते. त्यावेळी अमोल खेमनर याला तंबी देण्यात आली होती. त्यानंतर खेमनर याच्यासोबत असणाऱया सहाजणांनी कट रचून त्यांच्याकडील पांढऱया रंगाच्या ब्रीझा कारमधून येऊन संबंधितांवर दबाव टाकून दमबाजी व मारहाण केली. तसेच अल्पवयीन मुलीचे आजोबा आणि आजीला मारहाण करून ‘आमच्या नादाला लागल, तर एकेकाला संपवून टाकू,’ अशी धमकी देत मुलीला पळवून नेले होते.

आरोपींनी पीडित मुलीला श्रीगोंदा, दौंड, पाटस, बारामती, भिगवण येथे फिरविले असल्याचे तांत्रिक तपासातून निष्पन्न झाल्याने पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या पथकाने त्या ठिकाणी तपास करून शोध केला. तपास पथकाने तत्काळ तेथे जाऊन दीड दिवसात अल्पवयीन मुलगी व आरोपींना पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक मारुती-सुझुकी ब्रीझा कार व एक दुचाकी हस्तगत केली आहे.

घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, फुरकान शेख, संतोष खैरे, गणेश लोंढे, पोलीस शिपाई अमृत आढाव, सुभाष घोडके, प्रमोद गाडेकर, प्रमोद जाधव, आकाश बहिरट, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.