पोलार्डचा पराक्रम, सहा चेंडूंत सहा षटकार; गिब्स, युवराजच्या विक्रमाची बरोबरी

वेस्ट इंडीजचा कर्णधार कायरॉन पोलार्ड याने बुधवारी मध्यरात्री आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पराक्रम केला. त्याने श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज अकिला धनंजयाच्या षटकातील सहाही चेंडूंवर सणसणीत षटकार खेचून काढले. अशी कामगिरी करणारा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हर्षेल गिब्स व युवराज सिंग यांच्यानंतरचा तिसराच फलंदाज ठरला आहे.

कायरॉन पोलार्डने डावातील सहाव्या षटकांत हा करिष्मा करून दाखवला. वेस्ट इंडीजने ही लढत 4 गडी व 41 चेंडू राखून जिंकली आणि तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

14 वर्षांनंतर

2007 साली दक्षिण आफ्रिकेच्या हर्षेल गिब्सने नेदरलॅण्डच्या डॅन वॅन बुंगे याच्या गोलंदाजीवर अशी अद्वितीय कामगिरी करून दाखवली होती. पण हा वन डे सामना होता. त्यानंतर युवराज सिंगने 2007 साली टी-20मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर सहाही चेंडूंवर हवाई हल्ले केले होते. त्यानंतर आता तब्बल 14 वर्षांनंतर पोलार्डने फटकेबाजी केली.

सर्वात चांगला अन् वाईटही दिवस

श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज याच्यासाठी हा दिवस संमिश्र ठरला. वेस्ट इंडीज धावांचा पाठलाग करीत असताना श्रीलंकेकडून चौथे षटक अकिला धनंजया याने टाकले. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने एविन लुईसला, तिसऱ्या चेंडूवर ख्रिस गेलला आणि चौथ्या चेंडूवर निकोलस पूरणला बाद करीत दमदार हॅटट्रिक नोंदवली. टी-20 क्रिकेटमध्ये हॅटट्रिक करणारा तो 14 वा खेळाडू ठरला आहे. पण याच लढतीत त्याच्या एका षटकात कायरॉन पोलार्डने सहा षटकार चोपून काढले.

आपली प्रतिक्रिया द्या