किल्ले सिंधुदुर्गला जागतिक वारसा स्थळ दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न

521

सामना ऑनलाईन । मालवण 

महाराष्ट्रातील किल्ल्यांची बांधणी व ऐतिहासिकपणा अन्य कुठल्याही प्रांतात दिसत नाही. मालवण समुद्रातील किल्ले सिंधुदुर्गची उभारणी पाहता  या किल्ल्यांसारखा भव्य व् अदभुत किल्ला आपण आजपर्यंत पाहिला नाही. या किल्ल्यास जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आंतरराष्ट्रीय किल्ले अभ्यास समिती पथक प्रमुख डॉ. हॅन्स रुडॉल्फ न्यूमन (जर्मनी) यांनी मंगळवारी  किल्ले सिंधुदुर्ग येथे बोलताना सांगितले.
सिंधुदुर्ग किल्ल्याचे नैसर्गिक रूप कायम ठेवण्यासाठी ‘इकोफोर्ट’ तसेच किल्ल्यातील रहिवाशांचे स्थलांतर न करता गावपण टिकवण्यासाठी ‘हेरिटेज व्हिलेज’ या संकल्पनाही राबविण्यात येणार आहेत. असेही यावेळी सांगण्यात आले.

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संवर्धन व पर्यटन विकासाच्या दृष्टीने त्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा मिळण्यासाठी युनेस्कोमार्फत आतंरराष्ट्रीय किल्ले अभ्यास समिती महाराष्ट्रातील निवडक पाच किल्ल्यांची पाहणी करत आहे. किल्ल्याची पाहणी करून जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा मिळण्यासाठी समिती युनेस्कोकडे अहवाल सादर करणार आहे. हा दर्जा प्राप्त झाल्यास किल्ला जागतिक नकाशावर येऊन विकासासाठी आंतरराष्ट्रीय निधी प्राप्त होणार आहे. या पाच किल्ल्यामध्ये समावेश असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी मालवणच्या समुद्रात साडेतीनशे वर्षांपूर्वी उभारलेल्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गची जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात यावे यासाठी पाहणी करण्यात आली.

संयुक्त राष्ट्र शैक्षणीक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना अर्थात युनेस्को च्या आंतरराष्ट्रीय किल्ले अभ्यास समितीच्या १५ सदस्यीय पथकाने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजी राजे यांच्यासमवेत आज मंगळवारी किल्ले सिंधुदुर्गची पाहणी केली. यावेळी प्रथम संभाजी राजेंकडून शिवराजेश्वर मंदिरातील शिवरायांच्या मूर्तीला भरजरी वस्त्र व जिरेटोप प्रदान करण्यात आले. यावेळी किल्ले अभ्यास समिती पथकाचे प्रमुख डॉ. हॅन्स रुडॉल्फ न्यूमन, पुरातत्व विभागाचे राजेश दिवेकर, किल्ले प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, सागरी अभ्यासक महेंद्र पराडकर, किल्ला रहिवासी व पुजारी श्रीराम सकपाळ, पथकातील सदस्य व इतर उपस्थित होते.

महाराष्ट्रातील पाच किल्ल्यांची निवड

राजस्थान मधील सात किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा प्राप्त झालेला असताना छत्रपती शिवरायांचा वैभवशाली इतिहास असणाऱ्या महाराष्ट्रातील एकही किल्ला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झालेला नाही. येथील किल्ल्यांना मोठा पराक्रमी इतिहास असूनही त्यांचा परिपूर्ण अभ्यास व सादरीकरण न झाल्याने ते दुर्लक्षित राहिले. राजस्थान प्रमाणे महाराष्ट्रातील गड किल्ले, दुर्ग, भुईकोट किल्ले यांनाही जागतिक वारसा स्थळ दर्जा मिळण्यासाठी आपण राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने हा दर्जा मिळण्यासाठी राजगड, रायगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा व राज्यशासनाने निवडलेला कोणताही एक किल्ला अशा एकूण पाच किल्ल्यांची पाहणीसाठी निवड करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणाऱ्या युनेस्कोच्या किल्ला अभ्यास समितीकडून या किल्ल्यांची पाहणी करण्यात येत आहे असेही संभाजी राजे यांनी सांगितले.

अहवाल युनेस्कोला सादर करणार

आंतरराष्ट्रीय किल्ले समितीच्या या पथकात डॉ. न्यूमन यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रांस आदी देशांचे तज्ञ अभ्यासक सहभागी झाले होते. या पथकाकडून सिंधुदुर्ग किल्ल्याला बोटीद्वारे समुद्रातून प्रदक्षिणा घालून संपूर्ण तटबंदीची पाहणी करून छायाचित्रे घेण्यात आली. तसेच किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिर, विहिरी, राणीची वेळा, तलाव, बुरुज, इतर मंदिरे यांसह किल्ल्याच्या एकूण बांधकामाची पाहणी करून आवश्यक माहिती या पथकाकडून नोंद करण्यात आली. यावेळी संभाजी राजे, श्रीराम सकपाळ, गुरुनाथ राणे यांनीही किल्ल्याच्या इतिहासाबाबत आवश्यक माहिती पथकास पुरविली. या माहितीचा परिपूर्ण अहवाल बनवून तो युनेस्कोला सादर करण्यात येणार आहे. तसेच जागतिक वारसा स्थळ निवडण्यासाठी होणाऱ्या मतदानात मतदान करण्याचा अधिकार असणारे तीन सदस्य या पथकात असल्याने सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील उर्वरित निवडक पाच किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ दर्जा मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रयत्न आमच्याकडून केले जातील असे यावेळी डॉ. न्यूमन यांनी सांगितले.

किल्ल्याचा ऐतिहासिकपणा पुरातत्व विभागाने जपला

पाहणी दरम्यान पुरातत्व विभागाकडून सुरु असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ढासळलेल्या तटबंदी दुरुस्तीच्या कामाचीही संभाजी राजे व किल्ले अभ्यास समिती पथकाने पाहणी केली. हे काम चांगल्या पध्द्तीने होत असून ३५० वर्षापूर्वीचा तोच ऐतिहासिक पणा जपण्यात आला आहे. दुरुस्ती काम अंतिम टप्प्यात आले आहे, असे सांगत यावेळी संभाजी राजे यांनी पुरातत्व विभागाच्या कामाचे कौतुक केले.

आपली प्रतिक्रिया द्या