समलिंगी पुरुषांना ठार करणाऱ्या सिरीयल किलरला मृ्त्युदंडाची शिक्षा

987

समलिंगी पुरुषांना लक्ष्य करुन त्यांचा खून करणाऱ्या सिरीयल किलरला अखेर ठार मारण्यात आले आहे. गॅरी रे बॉवेल असे या आरोपीचे नाव असून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. गॅरीला विषारी इंजेक्शन देऊन ठार मारण्यात आले. मृत्यूदंडाच्या शिक्षेला सामोरं जाण्यापूर्वी गॅरीने ‘आपल्या कृत्याचा पश्चाताप होत असल्याचं म्हटलं होतं’

गॅरीला जेव्हा ठार मारण्यात आलं तेव्हा तो 57 वर्षांचा होता.  अमेरिकेतील फ्लोरीडा भागामध्ये ईस्ट-कोस्ट परिसरात ‘आय-95’ हा महामार्ग आहे. या महामार्गावरच गॅरीने सगळे खून केले होते. त्याने या रस्त्यावर एकूण 6 समलिंगी पुरुषांची हत्या केली होती.  ‘आय-95’ या महामार्गावर त्याने या सगळ्या हत्या केल्याने गुन्हे विश्वात ‘आय-95 किलर’  म्हणून ओळखले जात होते.

गॅरीविरोधात न्यायालयात जेव्हा खटला उभा राहिला तेव्हा त्याने त्याचे बालपण अत्यंत कटू प्रसंगांनी भरलेले होते असं सांगितलं. त्याच्या आईने गॅरीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर दोनवेळा लग्न केलं होतं. या दोन्ही सावत्र बापांनी गॅरीचा जबरदस्त छळ केला होता. बालपणी झालेल्या या आघातातून गॅरी सावरला नव्हता. त्याने वयाच्या 11 व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली आणि अंमली पदार्थांच्याही तो आहारी गेला होता. वयाच्या 13 व्या वर्षी त्याने त्याच्या दुसऱ्या सावत्र बापाचा दगडाने ठेचून खून केला होता.

गॅरीने त्याला ठार मारण्यापूर्वी त्याच्या कृत्यामुळे इतरांना जो त्रास आणि वेदना सहन कराव्या लागल्या त्याबद्दल माफी मागितली आहे. ‘मला आयुष्यात असं कधीच बनायचं नव्हतं, कोणालाही आयुष्यात सिरीयल किलर बनावे असं वाटत नाही’ असं गॅरीने म्हटलं होतं. गॅरीतर्फे त्याच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. गॅरीला दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगिती मिळावी अशी त्याच्या वकिलांनी मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती.

आपली प्रतिक्रिया द्या