किम जोंगची हुकूमशाही! बायबल जवळ बाळगल्याने दोन वर्षांच्या मुलाला जन्मठेप

बायबल जवळ बाळगणाऱ्या ख्रिश्चनांना उत्तर कोरियामध्ये मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. असेच एक प्रकरण उत्तर कोरियामध्ये समोर आले असून एका कुटुंबाला त्यांच्या धार्मिक प्रथा पाळल्याबद्दल आणि सोबत बायबल बाळगल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अटक झालेल्या कुटुंबामध्ये एका दोन वर्षांच्या मुलाचा देखील सहभाग आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. स्टेट डिपार्टमेंटच्या 2022 च्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवालाचा अंदाज आहे की उत्तर कोरियामध्ये 70,000 हून अधिक ख्रिश्चन आणि इतर धर्माचे लोक तुरुंगात आहेत.

या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, तुरुंगात टाकलेल्यांमध्ये एक दोन वर्षांचा मुलगा होता, ज्याला त्याच्या पालकांजवळ बायबल सापडल्यानंतर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. कुटुंबाला त्यांच्या धार्मिक प्रथा आणि बायबल बाळगल्याबद्दल अटक करण्यात आली. दोन वर्षांच्या मुलासह संपूर्ण कुटुंबाला 2009 मध्ये राजकीय तुरुंगाच्या छावणीत जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

तुरुंगात असलेल्या ख्रिश्चनांनी भीषण परिस्थिती आणि विविध प्रकारच्या शारीरिक शोषणाचा सामना केला आहे. अहवालात असे नमूद केले आहे की, शमॅनिक अनुयायी आणि ख्रिश्चन या दोघांविरुद्ध केलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी राज्य सुरक्षा मंत्रालय जबाबदार आहे.

कोरिया फ्युचर, उत्तर कोरियामध्ये “न्याय आणि उत्तरदायित्वाला गती देण्यासाठी काम करत असलेल्या” ना-नफा संस्थेच्या अहवालाचा हवाला देत, परराष्ट्र विभागाचे म्हणणे आहे की, उत्तर कोरियाचे सरकार धार्मिक श्रद्धा पाळणाऱ्यांचा छळ करते. तसेच त्यांना आजीवन कारावासात टाकून त्यांचे अधिकार नाकारले जाऊ शकतात किंवा ते लैंगिक हिंसाचाराला बळी पडू शकतात.