‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया

19004

उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग यांची विचित्र वर्तणूक साऱ्यांनाच माहीत आहे. एक छोटीशी चूक आणि जीव गमवावा लागण्याची शक्यता असते. त्यांच्या या वागणुकीच्या चर्चा जगभर रंगतात. पण, सध्या त्यांच्या बाबतीतल्या एका वृत्ताने मात्र चांगलीच खळबळ माजवली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग उन यांची प्रवृत्ती अत्यंत घातकी आणि राक्षसी असल्याचा खुलासा उत्तर कोरियात कैदी म्हणून राहून आलेल्या एका व्यक्तिने केला आहे. किम इल सून असं या व्यक्तिचं नाव असून तो केईचोन इथल्या छळछावणीत बंदी म्हणून राहत होता. ही छावणी प्योंगयांगच्या उत्तर दिशेला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, या छळछावणीसाठी जे सुरक्षा रक्षक नेमले आहेत, त्यांच्या भोजनाच्या व्यवस्थेसाठी तिथेच शेती केली जाते. पण, पीक चांगलं यावं म्हणून जे नैसर्गिक खत वापरलं जातं ते उत्तर कोरियाच्या राजकीय कैद्यांच्या मृतदेहांपासून बनवलेलं असतं, असा खळबळजनक खुलासा सून याने केला आहे.

सूनच्या म्हणण्यानुसार, या छावणी परिसरातील जमीन अत्यंत सुपीक आहे आणि इथे शेती केल्यास पीक चांगलं येतं. त्यामुळेच इथे उत्तर कोरियाच्या राजकीय कैद्यांना पुरण्यात आलं आहे, जेणेकरून त्यांच्या मृतदेहांचा वापर नैसर्गिक खताप्रमाणे करता येईल. सुरक्षा रक्षकांच्या म्हणण्यानुसार, तिथे काही प्रमाणातच मृतदेह पुरलेले असून अजून जास्त प्रमाणात जर मृतदेह पुरले तर ही जमीन आणखी सुपीक होईल. किम सून याच्या खुलाश्यानंतर किम जोंग उन यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या