‘केईएम’मध्ये ब्लड संकलन, समन्वयासाठी 24 तास ‘हेल्प डेस्क’, शिवसेनेच्या पाठपुराव्यानंतर रुग्णालयाचा निर्णय

पालिकेच्या ‘केईएम’ रुग्णालयात ब्लड संकलन-समन्वय आणि रुग्णांच्या सुविधेसाठी 24 तास ‘हेल्प डेस्क’ सुरू करण्यात येणार असून ब्लड संकलनाच्या व्यवस्थेसाठी तातडीने दोन खास अधिकाऱयांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

‘केईएम’मध्ये ब्लड तुटवडय़ाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेवकांनी रुग्णालय प्रशासनाशी आज चर्चा केल्यानंतर तातडीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे रुग्णांना लवकरच दिलासा मिळणार आहे.

पालिकेच्या ‘केईएम’ रुग्णालयासह मुंबईत सद्यस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मुंबईभरात रक्तदान शिबिरांचे आयोजनही करण्यात येत आहे.

मात्र अजूनही मुंबईत रक्त तुटवडा असल्याचे बोलले जात आहे. यामुळे रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ, अनिल कोकीळ, दत्ता पोंगडे, सिंधू मसुरकर, उर्मिला पांचाळ यांनी आज ‘केईएम’चे डीन डॉ. हेमंत देशमुख यांची भेट घेतली.

यावेळी रुग्णालयाच्या विविध प्रश्नांवर चर्चाही करण्यात आली. या वेळी रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी डीन डॉ. देशमुख यांनी स्वतः पुढाकार घेऊन नियोजन-कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन शिवसेना नगरसेवकांना दिले. यावेळी डॉ. नाडकर, डॉ. प्रवीण बांगर, केईएम रक्तपेढीच्या प्रमुख अधिकारी जयश्री शर्मा आदी उपस्थित होते.

आता नॉनकोविड आजारांवर पूर्ण क्षमतेने उपचार

पालिकेचे प्रमुख रुग्णालय असलेल्या आणि तब्बल 2250 खाटांची व्यवस्था असणाऱया ‘केईएम’ रुग्णालयात अत्यवस्थ कोविड रुग्णांसाठीही आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. कोरोनाच्या प्रभावाच्या काळात कोविडसाठी तब्बल 525 खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या.

आता कोरोना नियंत्रणात आल्याने सद्यस्थितीत सुमारे 100 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शिवाय नॉनकोविड आजारांवर पूर्ण क्षमतेने उपचार सुरू असल्याची माहिती केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या