गुजराती माणसाने सुरक्षा यंत्रणांना गंडवलं, Z+ सुरक्षा घेऊन कश्मीरमधील संवेदनशील भागाचा दौरा केला

पंतप्रधान कार्यालयातील (पीएमओ) वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून सुरक्षा यंत्रणांना गंडवणाऱ्या एका गुजराती माणसाला जम्मू-कश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. किरण पटेल (Kiran Patel) असे या व्यक्तीचे नाव आहे.

पीएमओ कार्यालयात अतिरिक्त संचालक असल्याचे सांगून या ठगाने प्रशासकीय सेवांचा लाभ घेतला आणि झेड प्लस सुरक्षा, बुलेटप्रुफ महिंद्रा स्कॉर्पिओ एसयूव्हीची सेवाही उपभोगली. यासह जम्मू-कश्मीरमधील संवेदनशील भागाचा दौराही केला. तसेच फाईव्ह स्टार हॉटेलमध्येही राहिल्याचे समोर आले आहे. एका सामान्य व्यक्तीने सुरक्षा व्यवस्थेच्या चिंधड्या उडवल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

किरण पटेल याला जम्मू-कश्मीर पोलिसांनी 10 दिवसांपूर्वी अटक केली होती. परंतु पोलिसांनी ही माहिती गुप्त ठेवली होती. या दरम्यान त्याची कसून चौकशीही करण्यात आली. गुरुवारी न्यायदंडाधीकाऱ्यांनी त्याची तुरुंगात रवानगी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ‘इंडिया टूडे’ने याबाबत वृत्त दिले आहे.

किरण पटेल याने आपल्या ट्विटर बायोमध्ये पीएचडी असे लिहिलेले असून फेब्रुवारी महिन्यात त्याने जम्मू-कश्मीरचा पहिल्यांदा जौरा केला होता. यावेळी त्याने सर्व प्रशासकीय सेवांचा लाभ घेतला होता. या दौऱ्याचे फोटो, व्हिडीओही त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले होते. यात त्याच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवान बंदूक ताणून उभे असल्याचे दिसतेय.

तसेच पॅरामिलिट्री गार्डसह बडगाममधील दूधपथरी येथील बर्फाच्छादित भागातून जाताना दिसत आहे. श्रीनगरमधील क्लॉक टॉवर लाल चौकासमोर आणि बारामुल्ला येथील हिंदुस्थान-पाकिस्तान बॉर्डरवरही तो फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे.

किरण पटेल याने गुजरातमधून अधिक पर्यटक आणण्याच्या पर्यायांवर आणि दुधपथरी हे पर्यटनस्थळ करण्याबाबतही अधिकाऱ्यांसोबत बैठकाही घेतल्या होत्या. मात्र दोन आठवड्यात दोनदा श्रीनगरला भेट दिल्यानंतर त्याच्यावरील संशय वाढला. गुप्तचर संस्थेने जम्मू-कश्मीर पोलिसांना या ठगाबद्दल अलर्ट केले. त्यानंतर त्याच्यावर कडक नजर ठेवण्यात आली होती. तो पुन्हा जम्मू-काश्मीर दौऱ्याला येताच श्रीनगर येथून त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर कलम 419, 420, 467, 468, 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.