ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन

‘हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी,’ असा गजर करीत आपल्या अनोख्या शैलीने वारकरी संप्रदायाचे विचार सामान्यांपर्यंत त्यांच्याच भाषेत घराघरांत पोहोचवणारे ज्येष्ठ प्रवचनकार आणि कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांनी आज नेरुळ येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते.

शुद्ध वाणी आणि स्पष्ट विचारसरणी हेच व्रत मानून त्यांनी आपले अवघे आयुष्य अध्यात्माचा प्रचार, प्रसार आणि प्रबोधनासाठी अर्पण केले. त्यांच्या निधनाने संत साहित्याचे एक थोर अभ्यासक काळाच्या पडद्याआड गेले. विठ्ठल सोप्या शब्दांत सांगणारी वाणी आज शांत झाली व संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय शोकसागरात बुडाला.

बाबा महाराज सातारकर यांच्या कुटुंबाचे मूळ निवासस्थान हे दक्षिण मुंबई-गिरगावातील दादा महाराज सातारकरवाडीत होते. इथूनच त्यांच्या कीर्तन, प्रवचनाची वाटचाल सुरू झाली. अलीकडच्या काळात ते नवी मुंबईच्या नेरुळ येथील आगरी-कोळी भवनासमोरील वसाहतीत मुलीकडे वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपासून वयोमानानुसार त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांच्या कीर्तनाचे कार्यक्रमही कमी झाले होते. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात ह.भ.प. भगवती महाराज व रासेश्वरी चोणकर या दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

नेरुळ येथे आज अंत्यसंस्कार

बाबा महाराज सातारकर यांचे पार्थिव सायंकाळी चार वाजता नेरुळ येथील बाबा महाराजांनीच स्थापन केलेल्या विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात आणण्यात आले. तेथे वारकरी संप्रदायातील हजारो भाविकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. उद्या शुक्रवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव दर्शनासाठी याच देवळात ठेवण्यात येणार आहे. आज दुपारपासून ते उद्या सायंकाळीपर्यंत या मंदिरात अखंड भजन करण्यात येणार आहे. उद्या सायंकाळी पाच वाजता नेरुळ येथील वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माणसात मंदिर निर्माण केले

बाबा महाराज सातारकर यांनी सर्व स्तरातील माणसांना एकत्र केले. समाज सुधारण्यासाठी जे आवश्यक कार्य आहे ते त्यांच्या हातून झाले. त्यामुळे लाखो लोक व्यसनांपासून दूर गेले. माणसात मंदिर निर्माण केले. हे त्यांचे फार महत्त्वाचे कार्य आहे अशी प्रतिक्रिया त्यांच्या कन्या भगवती महाराज सातारकर यांनी व्यक्त केली.

समाज व्यसनमुक्त केला

वारकरी संप्रदायामध्ये ज्या पाच परंपरा सर्वश्रेष्ठ आहेत त्यापैकीच सातारकर परंपरा ही एक आहे. बाबा महाराज सातारकर यांनी अध्यात्म बरोबर समाज सुधारण्यावर विशेष भर दिला. त्यांच्या सहवासात आल्यामुळे अनेक लोक व्यसनमुक्त झाले. अध्यात्माचा वारसा त्यांनी शेवटपर्यंत सुरू ठेवला, अशी प्रतिक्रिया त्यांचे नातू चिन्मय महाराज सातारकर यांनी व्यक्त केली.

अखेरची वारी अॅम्ब्युलन्समधून केली

बाबा महाराज सातारकर यांनी पंढरीची वारी कधीही चुकवली नाही. आईच्या उदरात असतानाही त्यांना पंढरीची वारी पहिल्यांदा घडली होती. वृद्धापकाळात प्रकृती साथ देत नसल्याने त्यांनी यंदाची वारी अॅम्ब्युलन्समधून केली होती.

अधिकमासाचा सोहळा राहत्या घरीच

बाबा महाराज सातारकर यांनी जाहीर कार्यक्रम वर्षांपासून बंद केले होते. प्रकृती साथ देत नसल्यामुळे त्यांनी यंदाचा अधिक मासाचा सोहळा नेरूळ येथील सेक्टर 18 मधील राहत्या घरीच केला या सोहळ्यात त्यांनी तीन दिवस ज्ञानेश्वरीवर प्रवचन दिले. हा कार्यक्रम त्यांचा शेवटचा ठरला, अशी प्रतिक्रिया त्यांचे शिष्य रमेश शिंदे यांनी व्यक्त केली.

मानवी जीवन हेच सार्थक – डॉ. सदानंद मोरे

वारकरी संप्रदायातील सातारकर परंपरा आगळी आहे. बाबा महाराजांचे आजोबा दादा महाराज या सातारकर फडाचे प्रवर्तक होते. अभंग, ओवी यांचा वेगळा अर्थ ते आपल्यापर्यंत पोहोचवायचे. सर्वसामान्य पद्धती अशी असते की मोक्ष मिळवणे गृहीत धरून कीर्तन केले जाते. पण बाबा महाराजांच्या आजोबांनी ते नाकारले. मोक्ष हे मानवी जीवनाचे सार्थक नाही. मानवी जीवन हेच सार्थक आणि ते चांगलं जगणं, यातच सगळी इतिकर्तव्यता आहेस, असं मानून ते प्रवचन करायचे. याला आधार म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचा अमृतानुभव हा ग्रंथ आहे. या अशा वेगळ्या विचारांमुळे अगदी उच्चशिक्षित वर्गही त्यांच्यामागे गेले. दादा महाराजांनंतर बाबा महाराजांच्या चुलत्यांकडे सातारकर फड आला. पुढे बाबा महाराजांनी तो वारसा समर्थपणे पुढे नेला. त्यादृष्टीने लहानवयापासून बाबा महाराजांना प्रशिक्षण देण्यात आले होते. बाबा महाराज उत्तम गायचे. त्यांच्या कीर्तनात गोडवा असायचा. कीर्तनातून श्रोत्यांशी ते आत्मियतेने संवाद साधायचे.
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)