कीर्तनकार इंदुरीकर महाराज प्रकरण आता जिल्हा कोर्टात

8997

प्रसिद्ध समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी कीर्तनातून प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याच्या आरोपाखाली त्यांच्या विरुद्ध संगमनेर न्यायालयात दाखल झालेल्या फिर्यादीवर आज सुनावणी होती. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने या सुनावणीस स्थगिती दिल्याने आता निवृत्ती महाराज प्रकरण जिल्हा न्यायालयात गेले आहे.

इंदुरीकर महाराजांच्या वतीने प्रथम वर्ग न्यायालयाच्या त्या हुकूमाविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात रिव्हीजन अर्ज दाखल केला होता. कनिष्ठ न्यायालया मध्ये  चुकीच्या पद्धतीने देशमुख यांच्यावर कारवाई केली असल्याचे जिल्हा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावरून जिल्हा सत्र न्यायालयाने खालील कोर्टातील सुनावणीला स्थगिती दिली आहे. आता पुढील सुनावणी दि. 20 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हा सत्र न्यायालयात होणार आहे, अशी माहिती इंदोरीकर महाराज यांचे वकील के. डी. धुमाळ यांनी दिली.

कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी कीर्तनातून प्रसुतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा (पीसीपीएनडीटी) भंग केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली होती. संगमनेर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांनी ही फिर्याद दिली होती. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने निवृत्ती महाराज देशमुख यांना सात ऑगस्ट रोजी म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयात हजर रहावे अशी नोटीस बजावली होती.

आज त्यावर सुनावणी होणार होती निवृत्ती महाराज या सुनावणीला हजर राहतील अशी अपेक्षा सर्वांची होती. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिल्याचे वकिलांनी सांगितल्यानंतर आता वीस तारखे कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान आज सकाळपासूनच विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी संगमनेर न्यायालयाच्या आवारा बाहेर ठाण मांडून बसले होते. ‘निवृत्ती महाराज हाजीर हो’ अशा आशेने बसलेल्या या सर्व व वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींचा मात्र भ्रमनिरास झाला. कारण इंदुरीकर महाराज न्यायालयात आलेच नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या