कीर्ती शिलेदार यांनी उलगडला नाट्यप्रवास…

सामना प्रतिनिधी । महाकवी कालिदास नाट्यगृह

संगीत नाटकात काम करताना अभिनय आणि गाणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. पण गाण्यात अभिनयाचा स्पर्श असेल तरच संगीत नाटक खऱया अर्थाने एका उंचीवर जाते, असे प्रतिपादन नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी केले. आई व वडिलांनी माझ्यावर केलेल्या संस्कारांमुळेच मी यशस्वी होऊ शकले, असेही त्यांनी सांगितले. प्रसिद्ध निवेदिका धनश्री लेले यांनी घेतलेली शिलेदार यांची मुलाखत रंगली. आपला नाट्यप्रवासच त्यांनी उलगडून दाखवला… त्या म्हणाल्या, आई जयमाला यांनी माझा गळा तयार केला. १४व्या वर्षी ‘शारदा’ नाटकात मी भूमिका केली. शब्दांची फेक, नजाकत, अभिनय याचे धडे मिळाल्याने माझ्यातील आत्मविश्वास वाढला असल्याचे त्यांनी सांगितले.

…पुन्हा वन्स मोअर

कीर्ती शिलेदार यांनी मूर्तिमंत भीती उभी, सूजन कसा मन चोरी, लाजवील वैऱयांना अशी अनेक नाटय़पदे साभिनय सादर केली. सत्तरीतही त्यांचा टिपेला जाणारा सूर, रक्तात भिनलेला अभिनय आणि संगीत रंगभूमीवरील प्रेम याचा रसिकांना पुन्हा प्रत्यय आला. रसिकांनी काही गाण्यांना ‘वन्स मोअर’ दिला. शिलेदार यांनीही या वन्स मोअरचा आदर करीत गाणी पुनः पुन्हा पेश केली.

आपली प्रतिक्रिया द्या