‘किसान आधार’ संमेलनाआधी छत कोसळल्याने खळबळ

43

सामना प्रतिनिधी । राहुरी

राहुरी कृषी विद्यापीठात होणाऱ्या किसान आधार संमेलनातील शास्रज्ञ व शेतकरी चर्चा सत्रासाठी बांधलेला मांडव अचानक कोसळल्याने विद्यापिठ प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कृषी विद्यापिठाच्या जिमखाना मैदानावर ही घटना घडली.

सोमवार पासुन किसान आधार संमेलनास सुरुवात होत आहे. संमेलनाच्या एक दिवस अगोदर ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. राहुरी कृषी विद्यापिठ तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने २५ ते २९ सप्टेंबर या कालावधीत किसान आधार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाची कृषी विद्यापिठाच्या आवारात गेल्या चार दिवसांपासून तयारी सुरू आहे. कृषी विद्यापीठातील जिमखाना मैदानाच्या उत्तर दिशेला प्रमुख पाहुण्यांसाठी स्टेज तर समोर शेतकरी व शास्रज्ञ चर्चा सञासाठी भव्य बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

पावसाचे दिवस असल्याने सुरक्षितता म्हणुन स्टेज तसेच १ हजार शेतक-यांच्या बैठकीच्या ठिकाणी भव्य मांडवाची उभारणी करण्यात आली होती. मांडवावर शेकडो पत्रे तसेच लोखंडी कैच्या टाकुन मान्यवरांच्या बैठकीची भरभक्कम व्यवस्था झाली होती. मात्र शनिवारी रात्री मोठ्या वजनाचा स्टेजवरील मांडव अचानक कोसळला. मांडवाच्या काही लाकडी बल्ल्याचे तुकडे झाले, तर लोखंडी पाईप देखील वाकडे झाले. या घटनेची माहिती मिळताच विद्यापीठ प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या