ऐतिहासिक! बळीराजा जिंकला!

27

सामना ऑनलाईन । मुंबई

नाशिक ते मुंबई असा अभूतपूर्व ‘लाँगमार्च’ काढून उभ्या देशाचे लक्ष वेधणाऱ्या महाराष्ट्रातील बळीराजाच्या आंदोलनाने आज इतिहास घडवला. रणरणत्या उन्हात १८० किलोमीटरचे अंतर सहा दिवसांत कापून हे ‘लाल वादळ’ सोमवारी पहाटेच आझाद मैदानात धडकले. विधान भवनाला घेराव घालण्याच्या पक्क्या इराद्यानेच हे वादळ घोंघावले होते. या वादळाचे रौद्र रूप पाहून सरकारची धावपळ उडाली. वाटेतच वादळ रोखण्याचे अयशस्वी प्रयत्नही झाले. अखेर सरकारने नमते घेतले आणि दुपारी मुख्यमंत्र्यांनी महामोर्चाच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली.

त्या वेळी आझाद मैदानात हजारो शेतकऱयांचा एल्गार सुरूच होता. चार तासांच्या चर्चेनंतर बळीराजाच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब झाले. २००८पासून कर्जमाफीसह सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या. त्यासाठी सहा महिन्यांची डेडलाइनही कबूल केली. आझाद मैदानात जल्लोष झाला! लेखी आश्वासन घेतल्यानंतरच शेतकऱ्यांनी परतीची वाट धरली.

सडणं आणि लढणं
‘घरात राहून मरण्यापेक्षा मुंबईत लढून मरू’ असे सांगणाऱ्या म्हातारीला पाहिले आणि मुंबईकरांचा घास थांबला! अन्नदात्याची ही व्यथा काळीज सोलून काढणारीच होती. डोक्यावर सूर्य तळपत होता पण त्यापेक्षा जास्त लाल टोपीखालील मस्तक पेटले होते. पायाखाली डांबराची भट्टी भणाणली होती, मात्र कुणाला कशाचीच तमा नव्हती. आता लढायचंच, सडायचं नाही… लढायचं आणि जिंकायचं हाच निर्धार होता… आणि अखेर लढाई जिंकली तेव्हा पायातील रक्तखुणांनी लाल झालेली आझाद मैदानातील मातीही सुखावली!

ही काही धार्मिक पदयात्रा नव्हती. हा होता अस्तित्वाचा लढा. देशभरात शेतकरी आंदोलने अनेक झाली. महाराष्ट्रातही शेतकरी रस्त्यावर उतरला, पण सहा दिवसांपासून नाशिकहून निघालेला लाँगमार्च जिंकण्याच्याच उद्देशाने बाहेर पडला होता. नाशिकहून निघाला तेव्हा लोकल न्यूज ठरलेला हा महामोर्चा नंतरच्या दोन दिवसांतच नॅशनल न्यूज बनला होता आणि जेव्हा या मोर्चाची यशाची सांगता झाली तेव्हाही नॅशनल न्यूजच ठरला.

आपली प्रतिक्रिया द्या