बळीराजाने जिंकली मुंबईकरांची मने

15

सामना ऑनलाईन । मुंबई

किसान मोर्चाचे वार्तांकन करण्यासाठी सकाळपासून प्रसिद्धीमाध्यमांनी गर्दी केली होती. प्रिंट आणि वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी हळूहळू येत गेले आणि या मोर्चाचे भव्यदिव्य असे रूप मुंबईकरांना सकाळपासूनच घराघरात दिसू लागले. पण कोणालाही कसलाही त्रास न दिल्यामुळे मोर्चाने मुंबईकरांची मने जिंकली. बळीराजाचा मोर्चा असल्यामुळे लोकांची आधीपासून या मोर्चाला सहानुभूती होती, ती अधिकच दुणावली.

वृत्तवाहिन्यांचे आणि वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी शेतकरी नेत्यांचे ‘कोट’, ‘बाईट’ घ्यायला लागले. ‘मुख्यमंत्र्यांशी किती वाजता चर्चा करणार’, ‘चर्चा यशस्वी होईल का’, ‘चर्चा फिस्कटली तर तुमची भूमिका काय राहील’, ‘मोर्चात फूट पडली आहे का’, ‘भाजप सरकारने आतापर्यंत फक्त लोकांना आश्वासन दिले आहे, तुमचीही बोळवण आश्वासनांनी केली तर’, ‘सरकारने चर्चेला बोलावलेच नाही तर’ अशा एक ना अनेक मराठी, हिंदी आणि इंग्रजीतील प्रश्नांच्या सरबत्तीला त्यांना सामोरे जावे लागत होते. शेवटी १२ वाजता शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाईल, असे निश्चितपणे सांगण्यात आले. पत्रकारांनी सोशल मीडियावरून ही माहिती आपापल्या वरिष्ठांना कळवली.

साडेबारा वाजता किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे, सरचिटणीस अजित नवले आणि आमदार जीवा गावित आणि इतर नेत्यांचे शिष्टमंडळ पोलिसांच्या गराडय़ात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला निघाले.

तुमच्या गाडय़ा आम्हाला नकोत

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी रात्री सोमय्या मैदानावर शेतकऱयांची भेट घेतली. त्यांनी आंदोलकांचे नेते किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे आणि सरचिटणीस अजित नवले यांना म्हटले, ‘नाशिकवरून हजारो आंदोलक पायी चालत आले आहेत. त्यांच्या पायांना जखमाही झाल्या आहेत. सोमय्या ते आझाद मैदान पायी जाण्याऐवजी त्यांच्यासाठी एसटी आणि खासगी बसेसची व्यवस्था करतो.’ या नेत्यांनी आंदोलकांना विचारले. आंदोलक म्हणाले, ‘नाशिकपासून सोमय्या मैदानापर्यंत असा १८० किलोमीटरचा प्रवास पायी केला. आता फक्त १५ किलोमीटरसाठी गाडय़ा कशाला असा सवाल करत आंदोलकांनी आझाद मैदानापर्यंत पायीच जाणार, असा एकमुखी निर्धार बोलून दाखवला आणि सोमय्या ते आझाद मैदान असा प्रवास सुरू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या