वारणा पात्राबाहेर; कृष्णेच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ, सांगलीत पूरपट्टय़ातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सांगली जिह्यात आजही पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे वारणा, कृष्णा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस आजही कायम राहिला. धरणाच्या पाणीसाठय़ात वाढ होत आहे. सांगली जिह्यातील वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.

वारणा नदीवरील काखे-मांगले, कुंडलवाडी पुलासह बंधारे सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सांगलीत आयुर्विन पुलानजीक कृष्णा नदीची पाणीपातळी सायंकाळी 27 फुटांवर गेली आहे. त्यामुळे पूरपट्टय़ातील नागरिकांना महापालिका प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

वारणा आणि कोयना धरणक्षेत्रात संततधार पाऊस सुरूच असल्याने दोन्ही धरणातील पाणीसाठा झपाटय़ाने वाढत आहे. वारणा धरण क्षेत्रात चोवीस तासांत 79 मि.मी. पाऊस झाला असून, धरणात 27.9 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. वारणा नदीपात्रातून पाणी बाहेर पडून दोन्ही बाजूच्या शेतकऱयांच्या शेतात शिरले आहे.

सांगली, मिरज शहरासह जिह्यातही दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी दिवसभरात 9 फुटांनी वाढली. पाऊस जोरात सुरू झाल्यामुळे कृष्णा, वारणा नदीकाठच्या नागरिकांच्या मनामध्ये महापुराची भीती निर्माण झाली आहे.

सांगली शहरात सतर्कतेचा इशारा

सांगली शहरातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रोड, शिव मंदिर परिसर, काका, दत्तनगर, मगरमच्छ कॉलनीमधील नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार सत्वर कार्यवाही करावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने आज करण्यात आले. महापालिका पथकाने पूरपट्टय़ातील नागरिकांना सूचना केल्या. महापालिका प्रशासनाने संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी सर्व तयारी केली असून, सोयी-सुविधांसह सतर्क आहेत. एनडीआरएफ टीम आणि महापालिका अग्निशमन दल सज्ज आहे.

24 तास वॉररूम कार्यरत असणार

पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनेचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे. नागरिकांनी स्थलांतरित होताना आपल्यासोबत यादीनुसार अत्यावश्यक साहित्य घेऊन निवारा केंद्रात स्थलांतरित व्हावे. आपत्तीकाळात नागरिकांनी 7066040330, 7066040331, 7066040332 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

औदुंबर दत्त मंदिरात पाणी शिरले

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत असून, पलूस तालुक्यातील औदुंबर येथील दत्त मंदिरात आज पाणी शिरले. त्यामुळे भाविकांसाठी मंदिर बंद करण्यात आले आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.